जांभुळपाडा रेशन दुकानदाराची हातचलाखी

कोरोनाच्या संकटसमयी गोरगरिबांचा पुरवठा विभागाकडून छळ

सुधागड-पाली (दत्तात्रय दळवी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांना मदतीचा हात देणे अपेक्षित असताना, जांभूळपाडा येथिल स्वस्त धान्य दुकानदार तसेच सुधागड तालुक्यातील इतर दुकानदारही धान्य वाटपात जनतेची सर्रास लुट करीत आहेत. सरकारने शिधापत्रिकाधारकाला देवू केलेल्या धान्यापेक्षा, दुकानदार नेहमीप्रमाणे कमी धान्य वाटप करीत असल्याची घटना नुकतीच जांभुळपाड्यात घडली.
सदर घटना काही जागरुक नागरिकांनी आमच्या प्रतीनिधीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याची शहानीशा करण्यात आली. या घटनेस पुरवठा अधिकारी, मंडळ अधिकारी, दक्षता समिती हे सर्वजण जबाबदार असल्याचे नागरिकांचे मत आहे. पुरवठा अधिकाऱ्याकडे सदर प्रकरणाची चौकशी केली असता “युनिटप्रमाणे आम्ही धान्य पुरवठा करतो“ असे सांगण्यात आले म्हणजेच सर्व शिधापत्रिकाधारकांचे धान्य हे पुरवठा विभागाकडुन पुरवल्याचे दिसते. फुकट मिळणाऱ्या धान्याचा हिशोब ठेवण्याची ज्या अधिकाऱ्याकडे जबाबदारी आहे त्याच्याकडेही चौकशी केली असता, धान्य व्यवस्थित वाटप झाल्याचे कळविण्यात आले. पुरवठा अधिकाऱ्याने दुकानदाराला सदर प्रकरणासंबंधात फोन केला असता “लाभार्थ्यांना पाठवून द्या“ असे दुकानदाराकडून उत्तर मिळाले. पिडीत नागरिकांनी दुकानदाराला फोन केल्यावर कमी दिलेलं धान्य, ऑगस्ट महिन्यात देतो असे दुकानदाराकडून सांगण्यात आले.
सरकारने स्वस्त धान्य दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता समितीचे गठन केले आहे, परंतु जांभुळपाड्यातील दक्षता समितीच्या सचिवाला फोन केला असता, त्यालाच लाभार्थ्यांना किती धान्य मिळते याची कल्पना नाही. अशा घटना सुधागड तालुक्यात वारंवार घडत आहेत. पुरवठा विभागाची नागरिकांच्या मनात असलेली भिती, दक्षता समितीचे दुर्लक्ष तसेच पुरवठा विभागाचे व दुकानदारांचे असलेले साटेलोटे पाहता नागरिकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत. नागरिकांच्या मनात दक्षता समितीने विश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे असताना, दक्षता समिती नक्की काय करते हा पहिला प्रश्न. जुलैला न दिलेलं धान्य जर का दुकानदार ऑगस्टला देणार असेल तर जुलैचा साठा गायब झाला का? , पुरवठा विभागप्रमुख यात जातीने लक्ष घालणार का? हा शेवटचा प्रश्न. असे बरेच अनुत्तरीत प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. पुरवठा विभागाची जबाबदारी ही तहसिलदारावर आहे व ते नेहमीप्रमाणे थातुरमातुर आश्वासन देतात की “पावती न देणाऱ्या“ दुकानदारांच्या विरोधात काय ठोस कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 437 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.