नगरविकास सचिव परदेशी निघाले संयुक्त राष्ट्रसंघात तर पुणे जिल्हाधिकारी पंतप्रधान कार्यालयात

दोन्ही अधिकाऱ्यांसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून पदमुक्तीचे आदेश

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त पदावर तडकाफडकी बदली करण्यात आलेले नगरविकास विभागाचे सचिव प्रविणसिंह परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या ग्लोबल कोर्डीनेटर या पदावर नियुक्ती केली. त्यामुळे त्यांना नगरविकास विभागाच्या सचिव पदावरून मुक्त करून संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्तीसाठी परवानगी द्यावी अशी सूचना केंद्र सररकारने राज्याच्या मुख्य सचिवांना केली. तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर करण्यात आल्याने त्यांनाही जिल्हाधिकारी पदातुन मुक्त करावे असे आदेशही दिल्याने राज्यातील दोन आयएएस अधिकाऱ्यांची वाणवा जाणवणार आहे.
राज्याच्या केडरचे असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांची नियुक्ती उच्चस्तरावर करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर परदेशी हे नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी नगरविकास विभागाचा पदभार स्विकारण्याऐवजी १० दिवसाच्या सुट्टीवर जाणे पसंत केले होते. त्यानंतर आपणाला संयुक्त राष्ट्रसंघातून विचारणा झाल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानुसार त्यांना तिकडे राष्ट्रसंघात नियुक्ती मिळाली असून त्यांचा तेथील नियुक्तीचा कालावधी ११ महिन्याचा राहणार आहे. तसेच त्यांचे नाव राज्याच्या मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत अद्याप असून विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार यांच्या निवृत्तीनंतर परदेशी यांचा मुख्य सचिव पदासाठी संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
तर नवल किशोर राम हे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी असून पुणे जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. त्यांची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयात उप सचिव या पदावर करण्यात आली आहे.

 335 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.