पनवेल-कोळीवाडा येथे नॉन कोविड गर्भवती माता प्रसूती केंद्र कार्यान्वित

पनवेल संघर्ष समितीने ‘करून दाखविले’

पनवेल : कोविड साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर गर्भवती मातांच्या आरोग्याची होणारी हेळसांड लक्षात घेऊन अतिशय कल्पकता आणि महिनाभर सातत्याने पाठपुरावा करून अखेरीस पनवेल संघर्ष समितीने नॉन कोविड गर्भवती माता प्रसूती केंद्र पनवेल-कोळीवाडा येथील जुन्या रुग्णालयात आजपासून लोकसेवेत समर्पित करण्यात यश मिळविले आहे.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल अंतर्गत हे २० खाटांचे नॉन कोविड गर्भवती माता प्रसूती केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोळीवाडा (उरण नाका) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये हे केंद्र सुरू व्हावे म्हणून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी अथक प्रयत्न केले आहेत.
कोविड साथ सुरू झाल्यानंतर अतिशय दूरदृष्टीने कांतीलाल कडू यांनी रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येचा अंदाज बांधून कामोठे येथील महात्मा गांधी हॉस्पिटलला कोविड दर्जा देण्याची मागणी करून तिथे ३५० खाटांची व्यवस्था करून कोविड सेवा साधली.
त्याच दरम्यान, पनवेल महापालिका, रायगड जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार महापालिकेने काही प्रमाणात गर्भवती मातांसाठी आरोग्य व्यवस्था सुरू केल्याचे कडू यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
मात्र, गर्भवती महिलांसाठी स्वतंत्ररित्या हॉस्पिटल नाही, ही खंत कडू यांना सतावत असल्याने त्यांनी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांच्याकडून परवानगी आणि २० खाटां आणि इतर सामुग्री प्राप्त करून घेतली. तसेच डॉ. स्वाती नाईक यांची विशेष नियुक्ती करून घेतली.
महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, मुख्य शहर अभियंता संजय कटेकर यांच्याकडून इमारतीमध्ये फर्निचर करून घेतले. स्वच्छता व आरोग्य विभागाचे निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडून तब्बल तीन वेळा पूर्ण इमारत स्वच्छ करून घेतली.
उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागनाथ येमपल्ले यांच्या सहकार्याने इमारतीची विशिष्ट चाचणी कामोठे एमजीएम हॉस्पिटलकडून करून घेतली.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भर्ती आणि परिचारिका, प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने आणि डॉ. येमपल्ले यांच्याकडून तत्वत: मान्यता घेण्यात कडू यांनी अजोड यश मिळवून अखेरीस अशक्य वाटणारे नॉन कोविड गर्भवती माता प्रसुती केंद्र लोकांच्या सेवेत समर्पित करण्यात मोठे योगदान दिले आहे.
डॉ. स्वाती नाईक या हॉस्पिटलचा पूर्ण कारभार डॉ. येमपल्ले यांच्या नेतृत्वाखाली सांभाळणार आहेत. डॉ. श्वेता राठोड त्यांना सहाय्य करतील. इथे नैसर्गिकरित्या बाळंतपण केले जाणार आहे. सिझरची व्यवस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएममध्ये होईल. त्याशिवाय गर्भवती महिलांची वैद्यकीय आरोग्य चाचणी आणि औषधोपचार विनामूल्य होणार आहेत, अशी माहिती डॉ. स्वाती नाईक यांनी दिली आहे.

 368 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.