मनोरुग्णालयात रुग्ण-कर्मचारी १५००, अन चाचणी झाली अवघ्या ३५-४० जणांची

किरीट सोमैय्या, निरंजन डावखरे यांच्या दौऱ्यात माहिती उघड

ठाणे : कोरोनाच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे मनोरुग्णालयातील निष्काळजीपणामुळे दोघा रुग्णांचा मृत्यू झाला. मनोरुग्णालयात रुग्ण-कर्मचारी अशा तब्बल १५०० हून अधिक जणांचा वावर असताना, आतापर्यंत केवळ ३५-४० चाचण्या झाल्याचा प्रकार धक्कादायक व गंभीर आहे, अशी टीका भाजपाचे प्रभारी किरीट सोमैय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी केली. या पार्श्वभूमीवर मनोरुग्णालयाची मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे येथील मनोरुग्णालयात दोघा रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ठाणे प्रभारी किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी आज मनोरुग्णालयाला भेट दिली. तेथील परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या ठिकाणी ८५३ रुग्णांवर उपचार सुरू असून, ७१३ कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल दीड हजारांहून अधिक जणांचा वावर असूनही, आतापर्यंत केवळ ३५ ते ४० जणांच्या कोरोना चाचण्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराबद्दल दोन्ही नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या भीषण परिस्थितीत राज्यातील ठाणे, येरवडा, नागपूर आणि रत्नागिरी येथील मनोरुग्णालयामध्ये विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मनोरुग्णालयात कोरोनाचा संसर्ग पसरल्यास भीषण परिस्थिती निर्माण होईल. राज्यातील सर्व मनोरुग्णालयातील स्थितीकडे मानवी हक्क आयोगाचे लक्ष वेधणार आहोत. तसेच तेथे कोरोना संसर्ग रोखण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करणार आहोत, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

 456 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.