पावसाने दडी मारल्याने भात रोपे धोक्यात

भात रोपाना बगळ्या आणि करप्या रोग लागण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे

शहापूर (शामकांत पतंगराव) : भात लावणीचा हंगाम सुरू झाला आणि पावसाने दडी मारल्याने शहापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या भात रोपांना धोका निर्माण झाला असून लावलेल्या रोपांवर बगळ्या व करप्या रोग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कोरोनाच्या संकटाने आर्थिक कोंडी झालेल्या शेतकऱ्यापुढे आता हे नवे संकट उभे ठाकले आहे
शहापूर तालुक्यात पावसाने उशिरा सुरुवात केली असल्याने भात पेरणीची कामे उशीरा सुरू झाली. पावसाची अनियमितता लक्षात घेऊन पेरलेले बी उगविण्यासाठी पाणी मारण्याचे वेगवेगळे पर्याय वापरून शेतकऱ्याने रोपे जगवून ती लावणी योग्य केली,या दरम्यान दहा ते बारा दिवस चांगला पाऊस पडल्याने भात लावणीला सुरुवात केली असतानाच पावसाने अचानक दडी मारली आहे,काही ठिकाणी लावणीची कामे अर्धवट असून काहींनी तर अजून सुरुवातही केली नाही.शहापूर तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लावणी केली जाते,पावसा अभावी साधारण पंधरा ते विस टक्के भात लावणीची कामे अर्धवट राहीली आहेत.पावसाच्या अनियमितपणामुळे लावलेली रोपे जगविण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.जुलै महिना तसा मुसळधार पावसाचा असतो पण जवळजवळ तो ही कोरडा गेला असून आता भात रोपांवर बगळ्या व करप्या रोग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या शेतकऱ्याला आता कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.सोसायट्यांची कर्जे काढून भात बियाणे,खते,शेती औजारे खरेदी करून मशागत केलेल्या शेतीने जर दगाफटका दिला तर कर्जबाजारी होण्याची वेळ येईल,सरकारने कर्जे माफ करावीत अशी मागणी होत आहे.
दरम्यान तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय यांनी टाकीपठार भागात पीक पाहणी केली आहे.
“पावसाने दडी मारली असली तरी शेताच्या परिसरात जे संरक्षित पाणी आहे किंवा शेजारी असलेल्या नाले,ओढयांचे पाणी शक्य होईल तिथे खाचरात अडवून ते शेतात सोडण्याचा प्रयत्न करावा,यामुळे लावलेल्या भात रोपांना जीवदान मिळेल” असे शहापूरचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय यांनी सांगितले.

 442 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.