कल्याण डोंबिवलीतही सुरु झाली १८ ॲन्टिजन टेस्टिंग सेंटर

विनामूल्य केल्या जातायेत टेस्ट, आतापर्यंत केल्या ३८९८ ॲन्टीजन टेस्ट,

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जास्तीत जास्त संशयितांची कोव्हिड तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने १८ ॲन्टिजन टेस्टिंग सेंटर सुरु केले असून त्या केंद्रामार्फत संशयित रुग्णांची ॲन्टिजन टेस्ट विनामुल्य केली जाते. महापालिकेच्या १० तापाच्या दवाखान्यात देखील संशयित रुग्णांची विनामुल्य ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत असून आत्तापर्यंत ३८९८ ॲन्टीजन टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी  १३७२ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळून आला. लक्षणे असणा-या संशयित रुग्णांची आर.टी.पी.सी.आर.टेस्ट केली जाते.
अधिकाधिक टेस्टींग होऊन कोव्हिड साथीला आळा बसावा याकरीता महापालिका क्षेत्रातील, खाजगी प्रयोगशाळा ॲन्टीजेन टेस्टींगसाठी इच्छुक असल्यास त्यांनाही सिव्हिल सर्जन यांचेमार्फत आता परवानगी दिली जाणार आहे. “फॅमिली डॉक्टर कोव्हिड फायटर” या मोहिमे अंतर्गत महापालिकेकडे सुमारे ७५ खाजगी डॉक्टरांनी सहभाग दर्शविला असून त्यामध्ये टिटवाळयातील डॉक्टर केदार पंडित, डोंबिवली पूर्व येथील डॉ. सागर मराठे, डॉ. योगेश सरोदे, डॉ. गायत्री कुलाली, डॉ. भावना ठक्कर व डोंबिवली पश्चिम येथील  डॉ. पांडे, डॉ. कुमावत आदी डॉक्टर सहभागी झाले असून महापालिकेला सहकार्य करत आहेत.
या मोहिमे अंतर्गत एकुण ९२ हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये सुमारे   १,७३,६१८  लोकसंख्येचे सर्व्हेक्षण झालेले असून यामध्ये १३७१ रुग्णांचे स्क्रिनींग करण्यात आलेले आहे. या सर्व्हेक्षणासाठी महापालिकेस डॉ. भिंगारे, डॉ. चिटणीस तसेच डॉ. प्रिती नंदा, डॉ. अमरीश नंदा, डोंबिवली पूर्व डॉ. श्रीपाल जैन व डॉ. वोरा, कल्याण पूर्व तसेच प्रथमेश सावंत, जाणिव सामाजिक संस्था, कोळसेवाडी, आदित्य साठे, वक्रतुंण्ड मित्र मंडळ, डोंबिवली पूर्व, गणेश निंबाळकर, मनिषा गांगुर्डे, डोंबिवली पश्चिम, मनिषा राणे, सागाव परिसर यांनी व त्‍यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच महापालिकेचे नगरसेवक व त्यांच्या २९४ कार्यकर्त्यांनी यासाठी मोठया प्रमाणात मदत केली आहे.
 महापालिकेचे नगरसेवक त्यांचे स्वयंसेवकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल स्क्रिनींग व पल्स ऑक्सिमिटरचा वापर करुन ऑक्सिजन पातळी तपासण्याचे काम करुन महापालिकेस सहकार्य करीत आहेत. आपल्या परिसरातील कोव्हिड रुग्णांची संख्या कमी व्हावी याकरीता जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी पुढे येवून सर्व्हेक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

 364 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.