लाखो मुलांचे प्राण वाचवण्यासाठी माझे प्राण गेले तरी बेहत्तर – मंजिरी धुरी
कल्याण : अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थी भारती संघटना पुन्हा आक्रमक झाली असून केंद्र सरकारच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी पुन्हा एकदा कल्याण नजीक बापगाव येथील मैत्रकुल याठिकाणी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. लाखो मुलांचे प्राण वाचवण्यासाठी माझे प्राण गेले तरी बेहत्तर असे मत यावेळी मंजिरी धुरी यांनी व्यक्त केले.
लाखो ट्विट्स, इमेल पाठवून पण प्रधानमंत्री त्याकडे बघायला तयार नाहीत याचा अर्थ त्यांनाही भारतीय विद्यार्थ्याचे झेनोसाईड करायचे आहे काय असा सवाल धुरी यांनी केला आहे. जो पर्यंत पदवी व पदव्युत्तर परीक्षा या महामारीचा व मुलांच्या परीक्षेचा विचार करून ऐच्छिक होत नाहीत तो पर्यंत मी उपोषण सोडणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढावा व विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तुलना बियर बार सोबत करणाऱ्या भूषण पटवर्धन यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी विद्यार्थी भारतीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मराठी भारती संघटनेच्या कार्याध्यक्षा विजेता भोनकर, छात्रशक्ती संस्थेच्या सेक्रेटरी स्मिता साळुंखे, तसेच मैत्रकूल जीवन विकास केंद्राचे प्रमुख संचालक आशिष गायकवाड आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
436 total views, 1 views today