कोचिंग क्लासेससाठी ‘एक बाक, एक विद्यार्थी’ संकल्पना राबवा

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेची मागणी

सभासदांची नवी समिती स्थापन करुन नवीन मसुदा बनवण्याची राज्य सरकारला विनंती

ठाणे : ‘अनलाॅक’ होताच प्रत्येक क्षेञाला चालना देत अर्थव्यवस्थेचे चक्र गतिमान केले जात असताना खासगी कोचिंग क्लासेसचे चाक माञ पुरते गाळात रुतले आहे. क्लासेसच्या जागांचे भाडे, विजबील, कर्मचारी;   शिक्षकांचा पगार देताना क्लासेस संचालकाचे पुरते कंबरडे मोडले आहे. त्यामुळे ‘एक बाक, एक विद्यार्थी’ या नव्या संकल्पनेनुसार कोचिंग क्लास चालवण्यास परवानगी द्यावी, ही आग्रही मागणी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेकडून करण्यात आली आहे. तसेच सभासदांची नवी समिती स्थापन करुन नवीन मसुदा बनवण्याची राज्य सरकारला विनंतीही संघटनेने केली आहे.
कोरोना काळात अर्थव्यवस्थेची घडी पुर्णपणे विस्कळीत झाली. नामांकित बड्या क्लासेसने विद्यार्थीवर्गाला आॅनलाईन पध्दतीनुसार शिक्षण देण्यास सुरवात केली. माञ निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचा भरणा असलेल्या कोचिंग क्लासेसकडून आॅनलाईन शिक्षणप्रणाली सुरु करुनही अनेक पालक व विद्यार्थीवर्गाला हीच पध्दत परवडणारी नाही. त्यामुळे क्लासेसमध्ये ‘एक बाक, एक विद्यार्थी’ नव्या संकल्पनेनुसार वर्ग चालवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी
कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळून विद्यार्थीवर्गाला शिकवण्यात येईल. त्यांना मास्क, सॅनिटायझर पुरवले जाईल असेही क्लास संचालकांनी मान्य केले आहे. तर तत्कालिन शिक्षणमंञी विनोद तावडे यांनी कोचिंग क्लासबाबत रद्द केलेला मसुदा आणि बरखास्त केलेली समिती याबाबत लवकरात लवकर संघटनेच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन नवीन समिती, मसुदा तयार करावा, या व अशा विविध मागण्यांचे पञ संघटनेने राज्य सरकार, ठाणे जिल्हा प्रशासन, महापालिका आयुक्तांना दिल्याचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी सांगितले.

…अन्यथा संचालकांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल

क्लासेसच्या जागांचे भाडे, इतर हफ्ते थकले आहे. अनेकांनी क्लासेसला टाळं ठोकून भाजी विकायला सुरवात केली आहे. माञ क्लासेस उभे करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडता आले नाही. तर आत्महत्या करण्यावाचून क्लासेस संचालकांकडे पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे अटी शर्तींच्या आधारे केवळ दहावी व बारावीच्या विद्यार्थीवर्गांचे क्लास उघडण्यास परवानगी द्यावी. मर्यादीत विद्यार्थी क्लासमध्ये बसवून त्यांच्या मोजक्याच बॅच सुरु होतील.
सचिन सरोदे, सचिव, कोचिंग क्लासेस संचालक संघटना, महाराष्ट्र राज्य

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.