शेकडो झोपडीधारक उतरणार रस्त्यावर…


‘समन्वय- मित्रधाम’ च्या झोपडीधारकांचे घरभाडे विकासकाने थकवले

ठाणे : ठाणे पूर्वेतील नेहमीच चर्चेत असलेल्या समन्वय आणि मित्रधाम या गृहनिर्माण संस्थेच्या गोरगरीब सदस्यांचे घरभाडे थकल्याने ते मेटाकुटीस आले आहेत. या सदस्यांना न्याय मिळावा आणि झोपडीधारकांची फसवणूक करणा-या विकासकावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा झोपडीधारक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील, असा इशारा दोन्ही संस्थांच्या रहिवासी संघाने दिला आहे.
रहिवासी संघाने न्याय मिळण्यासाठी आमदार संजय केळकर यांना पत्र दिले असून या पत्रानुसार ठाणे पूर्वेतील धोबीघाट परिसरातील झोपडपट्ट्यांचा एसआरए अंतर्गत विकास करण्यासाठी समन्वय आणि मित्रधाम गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. दोन्ही संस्थांचे साडेतिनशेहून जास्त सदस्य आहेत. यातील बहुतांशी सदस्य हे गरीब आणि दारिद्रयरेषेखालील आहेत. या प्रकल्पाचे विकासक राजेश गुप्ता आहेत. विकासकाम हाती घेतल्यानंतर हे रहिवासी भाड्याच्या घरात रहात आहेत, मात्र विकासकाने या रहिवाशांचे अनेक महिन्यांचे भाडे दिलेले नाही. शिवाय दरवर्षी १० टक्के भाडेवाढ होत आहे. रहिवासी हे भाडे घरमालकास देण्यास असमर्थ असून त्यांच्यावर बेघर होण्याची पाळी आल्याचा आरोप झोपडपट्टी संघाने केला आहे. घरभाड्याबाबत विचारणा केली असता विकासक प्रकल्प सोडून देण्याची धमकी देत असल्याचेही आ.केळकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 
गेल्या पाच वर्षात गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांची सर्वसाधारण सभाच झालेली नसून विकासक फक्त विश्वासातील निवडक सदस्यांनाच बैठकीस आमंत्रण देत असून मनमानी निर्णय घेऊन जबरदस्तीने निर्णय प्रक्रिया राबवत आहे. ही झोपडीधारकांची घोर फसवणूक आहे. याबाबत संबंधित सरकारी यंत्रणेकडे वेळोवेळी तक्रारी करुनही त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप संघाने केला आहे. 
या प्रकरणी सरकारी यंत्रणेने वेळीच लक्ष घालून गरीब झोपडीधारकांचे थकित भाडे मिळवून द्यावे, दोन्ही गृहनिर्माण संस्थांच्या मुख्य कार्यकारिणी समितीने कायद्याचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कारवाई करावी, दोन्ही समित्या बरखास्त करुन नवीन समित्या स्थापन कराव्यात आणि झोपडीधारकांची फसवणूक करणा-या विकासकावर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या आ. संजय केळकर यांना दिलेल्या पत्रात करण्यात आल्या आहेत. १५ दिवसात रहिवाशांना न्याय देण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली तर सर्व झोपडीधारक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील. यावेळी कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी विकासक आणि दोन्ही कार्यकारिणी समितीच्या पदाधिका-यांवर राहिल, असा आरोपही झोपडपट्टी संघाने केला आहे.

झोपडपट्टीधारकांच्या पाठीशी – आ. केळकर

समन्वय आणि मित्रधाम गृहनिर्माण संस्थांच्या गोरगरीब सदस्यांनी माझ्याशी संपर्क साधून झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबरोबरच विकासकावर गुन्हे दाखल करण्यासाठी मी त्यांच्या कायम पाठीशी राहीन. या प्रकरणी विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना मी पत्र दिले आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. वेळीच झोपडीधारकांना न्याय मिळाला नाही, तर ते तीव्र आंदोलन करतील, मी त्यांच्या बरोबर असेन, असे आ. संजय केळकर यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पांबरोबरच शहरातील अन्य झोपडपट्टी विकास योजनेत फसवणूक होत असलेल्या झोपडीधारकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यासाठी लढा उभारणार असल्याचे आ. केळकर यांनी सांगितले.

 609 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.