या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात मांडा टिटवाळा, कल्याण पूर्व व डोंबिवली पश्चिम परिसरात पुढील रविवारी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
कल्याण : कोरोना साथीला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका विविध प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून आज सोडियम हायपोक्लोराईडचा वापर करून जंतुनाशक विशेष फवारणी आणि पावसाळ्यातील आजाराला, डासांना प्रतिबंध करण्यासाठी धुरावणी अशा विशेष मोहिमेचा शुभारंभ सकाळी ७.०० वाजता पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत कल्याण(प) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाला.
या विशेष मोहिमेसाठी, फवारणीसाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये व रस्ते मोकळे ठेवावे असे आवाहन कालच महानगर पालिकेमार्फत करण्यात आले होते. सकाळी ७.०० वाजता पासूनच दुपारी दोन वाजेपर्यंत अग्निशमन विभागाच्या ७ फायर टेंडर व ३५ कर्मचाऱ्यांसह मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सोडियम हायड्रोक्लोराईडच्या वापर करून २/ब व ३/क प्रभागाच्या संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ३१ सिटी गार्ड जेट मशीन, ४ जीप मोउंटेड फॉगिंग मशीन तसेच छोट्या गल्ली बोळात ५ हँड पंप मशीन व ३५ हँड फॉगर मशीनच्या मदतीने २/ब व ३/क प्रभागातील सर्व आरोग्य निरीक्षक व सुमारे १०० आरोग्य कर्मचारी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे व सहा.सार्वजनिक आरोग्य अधिकारी अगुस्टीन घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली २/ब व ३/क प्रभागक्षेत्रातील संपुर्ण परिसरात फवारणी व धुरावणी केली.
तर दुपार नंतर डोंबिवली पूर्व येथील ६/फ, ८/ग, ९/आय व १०/ई या प्रभागात हि मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात मांडा टिटवाळा, कल्याण पूर्व व डोंबिवली पश्चिम परिसरात पुढील रविवारी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
471 total views, 1 views today