कोरोना संचार बंदीचा ‘आयटी’तील तरुणाने घेतला असा लाभ
बदलापूर :
“माझी रेणुका माउली . .
कल्पवृक्षाची सावली . . . . !
हे गाणे मनात आले कि, हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या माहूरगडावरील रेणुका देवीची आठवण होते. मनात असले तरी अनेकांना अजूनही या माहूरगडावर जाता आलेले नाही. माहितीच्या महाजालात घर बसल्या जर माहूरगडावरील रेणुका देवीचे दर्शन झाले तर किती आनंद होईल असे वाटत आहे ना. मग आपली हि इच्छा कोरोनच्या या संचार बंदीत आपला वेळ सत्कारणी लावून माहूर गडावरील रेणुका मातेच्या मंदिराची चक्क वेबसाईट तयार केली आहे. आता संकेत स्थळावर रेणुका मातेचे सहज दर्शन होणार आहे. एका क्लिकवर रेणुका मातेचे दर्शन घडविण्याची किमया पार पाडली आहे बदलापूर मधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विश्वनाथ खंदारे यांनी. ‘श्रीरेणुकादेवीमाहूरडॉटकॉम’ या नावाने हे संकेतस्थळ माहितीच्या महाजालात आता उपलब्ध आहे. http:\shreerenukadevimahur.com या संकेत स्थळावर हि माहिती उपलब्ध होईल.
कोरोनाच्या या संचार बंदीत काहीतरी सकारात्मक करावे या भावनेने बदलापूर येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या तरुणाने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील माहुर गडावरील श्री रेणुकादेवी देवस्थानचे संकेतस्थळ तयार केले आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ते भाविकांसांठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. पूजा सॉफ्ट या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे विश्वनाथ खंदारे यांनी त्यांच्या एका मित्राच्या सुचनेवरून हे संकेतस्थळ तयार केले. या संकेतस्थळाद्वारे रेणुकादेवीची नित्य आरती, पूजा, देव्हाऱ्यातील मंत्रपठण, आरत्या, गाणी, तिथपर्यंत जाण्याचा मार्ग, उपलब्ध वाहतूक व्यवस्था आदींची माहिती भाविकांना मिळणार आहे. यापूर्वी हे सर्व एकत्रितरित्या माहितीच्या महाजालात नव्हते. त्यामुळे माहूर देवस्थान व्यवस्थापनाची परवानगी घेऊन विश्वनाथ खंदारे यांनी हे संकेतस्थळ तयार केले. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य, छायाचित्रे, माहिती त्यांना देवस्थानच्या व्यवस्थापनाने पुरवली. या संकेतस्थळावर देवस्थानाविषयी माहिती देणाऱ्या लेखांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत. कोरोनाची संचार बंदी उठल्यानंतर मंदिरात केमेरे बसविण्यात येऊन ते सुरु झाले कि मग थेट प्रक्षेपण या संकेत स्थळावर उपलब्ध होईल असेही त्यांनी सांगितले.
आज पर्यंत आपण माहूरगडावर गेलो नाही. मात्र एका जिवलग मित्राने माहूरगडावरील रेणुका मातेचे संकेत स्थळ बनविण्याची सूचना केली. इतकेच नव्हे तर त्या मित्राने यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. माहूरगडावरील रेणुका मातेची माहिती मिळत गेली आणि आपल्याला त्याची उत्कंठा वाढू लागली. खरेच इतके चांगले देवस्थान आहे. या साठी आपण काहीतरी चांगले ठोस करू या असे मनाशी निश्चय करून कामाला लागलो असे विशवनाथ खंदारे यांनी सांगितले. कोरोनाच्या या संचार बंदी मध्येही माहूरगडावरील पुजाऱ्यांनी आणि अर्थातच आपल्या मित्राने जी जी आवश्यक माहिती पाहिजे होती ती मिळवून दिली आहे. आता एका क्लिकवर या गडावरील माहिती उपलब्ध होणार आहे. या पूर्वी कोणी हे संकेत स्थळ केले आहे का इथं पासून सर्व काही माहिती आपण घेतली. आणि शक्य तितके चांगले संकेतस्थळ बनविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही खंदारे यांनी सांगितले.
http:\shreerenukadevimahur.com. ‘श्रीरेणुकादेवीमाहूरडॉटकॉम’ या नावाने हे संकेतस्थळ माहितीच्या महाजालात आता उपलब्ध आहे. ते तयार करण्यासाठी १५ दिवस लागले. सध्या देवळातील आरत्या, पूजा ध्वनिमुद्रीत स्वरूपात असल्या तरी नवरात्रोत्सवापर्यंत भाविकांना देवीच्या ऑनलाईन दर्शनाचीही सोय केली जाईल, अशी माहिती विश्वानाथ खंदारे यांनी दिली आहे.
459 total views, 1 views today