गणेशोत्सव येतोय ! कोकणातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने करा

आढावा बैठकीत अशोक चव्हाण यांचे निर्देश

मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात अनेक चाकरमानी जातात. मात्र यंदा कोरोनामुळे कोकणात जाण्यासाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र एसटी सुरु होण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक जण खाजगी बस आणि गाड्यांनी कोकणात जातात.
कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा घेऊन आवश्यकता असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी चव्हाण यांनी आज दुपारी ३ वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत चारही पालकमंत्र्यांनी कोकणातील राष्ट्रीय महामार्गांच्या जिल्हानिहाय स्थितीबाबत अशोक चव्हाण यांना अवगत केले व दुरूस्तीसंदर्भात अनेक सूचना मांडल्या. त्यानंतर बैठकीला संबोधित करताना सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना अनेक निर्देश दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांसह संयुक्तपणे दौरा करून प्रमुख रस्त्यांची पाहणी करावी. आवश्यकता असेल त्याठिकाणी रस्ते व पुलांच्या दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करून गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी त्याची पूर्तता करावी. पूर्वीपासून प्रगतीपथावर असलेल्या रस्त्यांची कामे देखील विहीत कालावधीत पूर्ण करून घ्यावेत. ज्या ठिकाणी कामे अधिक काळ चालणार आहेत, त्याठिकाणी वळण रस्ता सुस्थितीत असल्याची खातरजमा करून घ्यावी, असे चव्हाण यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

 539 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.