शालेय क्रीडा स्पर्धांचे स्वरूप यावर राज्यस्तरीय ऑनलाईन परिसंवाद


महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाने केले आहे आयोजन

क्रीडामंत्र्यासह, पदाधिकारी, क्रीडा प्रशिक्षक, समीक्षक, खेळाडू, पालक घेणार सहभाग

कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या,  क्रीडा व युवक सेवा संचालनालय खात्याला ५० वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील खेळाडू, पालक, शाळा व महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक, क्रीडा पत्रकार, एकविध क्रीडा संघटना, भारतीय आॅलिंपिक महासंघ व महाराष्ट्र आॅलिंपिक असोसिएशन चे पदाधिकारी तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे अधिकारी या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी झटणाऱ्या व झगडणाऱ्या क्रीडा प्रेमींच्या माध्यमातून, रविवार २६ जुलै  रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत झूम अॅप व फेसबुक लाईव्हच्या आधारे आॅनलाईन राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य या खात्याचे कार्यालय पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग येथे ३ जुलै १९७० रोजी सुरू झाले. या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षात कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. त्यात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त, संचालक, विभागीय उपसंचालक व अन्य शासकीय अधिकारी तसेच जिल्हा क्रीडाधिकारी व त्यांचे सहकारी यांचा यथोचित सन्मान २९ आॅगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनी करणे, विविध स्पर्धांचे आयोजन, चर्चा व परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
२६ जुलै रोजी होणारा आॅनलाईन राज्यस्तरीय परिसंवाद हा “शालेय क्रीडा स्पर्धांचे स्वरुप बदलणे – काळाची गरज” या विषयावर होणार आहे. या परिसंवादात  महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री सुनिल केदार यांच्यासह   शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी जेष्ठ मार्गदर्शक व संघटक अशोक दुधारे, नाशिक जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक, भारतीय आॅलिंपिक महासंघाचे सहसचिव व महाराष्ट्र आॅलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष नामदेव शिरगावकर, जेष्ठ क्रीडा पत्रकार शिवाजी गोरे, औरंगाबाद येथून क्रीडा मार्गदर्शक डाॅ. उदय डोंगरे, सांगली येथून महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक अभय बिराज, जळगाव येथील जेष्ठ क्रीडा शिक्षक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी डाॅ. प्रदिप तळवळकर, नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी पीयूष अंबुलकर, पालकांचे प्रतिनिधी उस्मानाबाद येथून परमेश्र्वर मोरे व खेळाडूंचा प्रतिनिधी म्हणून वाशिम येथून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी सागर गुल्हाने आदी सहभागी होणार आहेत. हा परिसंवाद यशस्वी व्हावा म्हणून कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे, कार्याध्यक्ष उदय नाईक, कार्यवाह राजेंद्र शेटे, क्रीडा शिक्षक गजानन वाघ, क्रीडा पत्रकार अविनाश ओंबासे, विविध क्रीडा कार्यक्रमाच्या नियोजनातील तांत्रिक जाणकार गुणेश सर व राज्यस्तरीय परिसंवादाचे समन्वयक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी अंकुर आहेर  मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेत आहेत.
या राज्यस्तरीय परिसंवादात १) खेळाडू हा शालेय क्रीडा स्पर्धांचा केंद्रबिंदू मानून त्याला न्याय मिळावा. २) तालुकानिहाय सोयीसुविधांनी सुसज्ज क्रीडांगण
३) ग्रामिण व जिल्हा स्पर्धा आयोजन करणाऱ्या शिक्षकांच्या समस्या दूर करणे. ४) भारतीय पारंपरिक खेळांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले जावे.५) राज्य स्पर्धा आयोजन अनुदानात वाढ व्हावी. ६) शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) हा पुरस्कार पुन्हा सुरु व्हावा. ७) जिल्हा पातळीवरील गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक व अन्य पुरस्काराबाबत सुधारणा व्हावी. ८) राज्य स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंच्या गैरसोयी. ९) Fitness for All या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार, प्रत्येक तालुक्यात “दर्जेदार तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्रांची स्थापना व अंमलबजावणी” होणे अनिवार्य आणि यापुढेही “गाव तेथे क्रीडा संकुल” ही योजना सुरु करण्यात यावी. १०) राज्य पातळीवरील सर्वोत्तम कामगिरी करणा-या खेळाडूंना वार्षिक शिष्यवृत्ती, क्रीडा साधनांसाठी प्रोत्साहन देणे याविषयावर चर्चा होईल.
या परिसंवादात झालेली चर्चा,  सूचवलेले उपाय तसेच महाराष्ट्रातील क्रीडा प्रेमींनी आॅनलाईन व्यक्त केलेल्या अपेक्षा, या अहवालाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री,  क्रीडा मंत्री,  शिक्षणमंत्री, आयुक्त,  संचालक यांना सादर करण्याचा परिसंवादात सहभागी झालेल्या शिष्टमंडळाचा मनोदय आहे.
कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाने प्रातिनिधिक स्वरूपात आयोजित केलेल्या आॅनलाईन राज्यस्तरीय परिसंवादात,  महाराष्ट्रातील शालेय खेळाडू, पालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक, विविध एकविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यानी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सहभागी होऊन, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सुवर्ण महोत्सवानंतर, शालेय क्रीडा स्पर्धांबाबतच्या सुधारणा सुचवाव्यात असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी लक्ष्मण इंगळे  8425961666, अंकुर आहेर (समन्वयक) 8422919612 यांच्याशी संपर्क साधावा.

 975 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.