उल्हासनगर महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनसाठी विनामुल्य भूखंड द्या


आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची मागणी

मुंबई : उल्हासनगरमधील गायकवाड पाड्यातील अनधिकृत डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून हे डम्पिंग ग्राउंड तातडीने बंद करण्यात यावे तसेच उल्हासनगर महानगरपालिकेला घन कचरा व्यवस्थापनासाठी मौजे – उसाटने येथे असलेली जागा विनामूल्य उपलब्ध व्हावी, अशी लेखी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी गुरुवारी नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. तसेच त्यांनी यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव  महेश पाठक यांची भेट घेत त्यांच्याकडे ही मागणी केली. मौजे – उसाटने येथील तीस एकर सलग जागा (स.नं.५०/१ व स.नं.६२) विनामूल्य महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. डम्पिंग ग्राउंडकरीता जमीन विनामूल्य मिळण्याकरिता राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात यावा असे ही  त्यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.
उल्हासनगर कॅम्प – ५ मधील गायकवाड पाडा, महात्मा फुले नगर, सेक्शन -३६ जवळ असलेल्या अनधिकृत कचरा डेपोमुळे पसरणाऱ्या दुर्गधीतून स्थानिक नागरीकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यातून दुर्धर आजारांची लागण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने हा अनधिकृत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याविषयी डॉ. किणीकर यांनी पालकमंत्री शिंदे यांना विनंती केली.
महानगरपालिका व आरोग्य विभागाच्या नियमानुसार घनकचरा व्यवस्थापन नागरी वस्तीजवळ अथवा जलस्त्रोतांच्या जवळ करता येत नसतानाही या ठिकाणी अनधिकृतरित्या डम्पिंग ग्राउंड उभारले गेले आहे. या कचरा डेपोजवळ गॅस गोडावून आणि महावितरणच्या वीज ट्रान्सफार्मर असल्याने केव्हाही आग लागून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानीसह वित्तीय हानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असल्याची गंभीर बाब देखील त्यांनी या पत्रातून समोर आणली आहे.
उल्हासनगर येथील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस भयानक रूप घेत असून नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.  डॉ. किणीकर सातत्याने शासन स्तरावर याबाबत पाठपुरावा करत आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेची सद्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेला विनामूल्य देण्यात यावी अशी लेखी मागणी केली आहे.
सद्याच्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीत नागरिकांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असताना या डम्पिंग ग्राउंडमुळे आणखी साथीचे रोग बळावू शकत असल्याने हे डम्पिंग ग्राउंड तातडीने बंद करावे असे डॉ. किणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

 998 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.