सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, शिवभक्त आमदार संजय केळकर यांचा पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा
ठाणे : सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गची तटबंदी खचली असून संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक अंतुर किल्ल्याकडे जाणारा मार्ग पावसाळ्यात खचला आहे. या गड-किल्ल्यांची वेळीच दुरूस्ती हाती घ्यावी यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, शिवभक्त आमदार संजय केळकर यांनी पुरातत्व खात्याकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा सुरु केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सहवासाने आणि पराक्रमाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाची तटबंदी ढासळली असून वेळीच दुरूस्ती न झाल्यास तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळण्याची भीती सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे आणि कार्याध्यक्ष शिवभक्त संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गचा बुरुजही पाण्याच्या खालून ढासळत आहे. हा बुरुज पुर्णपणे ढासळण्याची भीती केळकर यांनी व्यक्त केली.
सह्याद्री प्रतिष्ठानने यापूर्वी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यावर स्वच्छता मोहिमा तसेच सूचना आणि दिशादर्शक फलक लावणे ही कामे केली असून दर दोन महिन्यांनी किल्ल्यावर दुर्ग दर्शन आणि मोहिमांचे आयोजन केले जाते.
संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक अंतुर किल्ल्याकडे जाणारा रस्ताही खचला असून शिवभक्त आणि पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पार्किंगपर्यंत सिमेंटचा रस्ता बांधला आहे, त्यामुळे किल्ल्याकडे जाणे पर्यटकांना सुरक्षित होते. सध्या पावसामुळे हा रस्ता खचला असून किल्ल्याकडे जाणे धोक्याचे झाले आहे. पुरातत्व विभागाने रस्ता धोकादायक आहे असा फलक लावला असून काही पर्यटक तिथे जात आहेत, त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे केळकर यांनी म्हटले आहे.
प्रतापगड आणि विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीची वेळीच दुरूस्ती न केल्यास मोठी हानी होऊ शकते, तर अंतुरकडे जाणारा रस्ताही तातडीने दुरूस्त करावा, यासाठी आ.केळकर यांनी पुरातत्व खात्याकडे पत्रव्यवहार करुन संबंधित अधिका-यांशी प्रत्यक्ष चर्चा केली आहे.
499 total views, 1 views today