वाढदिवस साजरा करणार नसल्याची मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा
मुंबई : ‘आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत‘, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे.
आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत. २७ जुलैस आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही त्यांनी केले.
गेल्या चार महिन्यांपासून राज्य सरकार नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत असून आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे असल्याचे सांगत वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान ,प्लाझ्मा दान करावे असे आवाहन त्यांनी केले.
498 total views, 1 views today