इंटरनेटच्या वापरामध्ये दहापटींनी वाढ

सेवा पुरवठादारांची तारेवरची कसरत

अंबरनाथ : गेल्या चार महिन्यांपासून लागू असलेल्या संचारबंदीमुळे घरगुती इंटरनेटच्या वापरात किमान दहापटींनी वाढ झाली असून अखंडीत सेवा देण्यासाठी संबंधित कंपन्या आणि एन्जसींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसायही वाढला आहे.
संचारबंदीमुळे ‘वर्क फ्रॉम होम’अपरिहार्य ठरले. त्यातच शाळा-महाविद्याायांचे वर्गही ऑनलाइन भरू आहेत. खाजगी क्लास, स्वयंसेवी संस्थांच्या बैठका हे सारे इंटरनेटशिवाय अशक्य आहे. पुन्हा या सर्व दिनचर्येतून विरंगुळ्यासाठी वेबसिरीज आणि चित्रपट पाहण्यासाठीही ‘नेट’शिवाय पर्याय नाही. करोना पूर्व काळातही घरोघरी इंटरनेट जोडण्या असल्या तरी दिवसभरात त्याचा फारसा वापर नव्हता. संध्याकाळी नोकरदार मंडळी घरी आली की इंटरनेटचा वापर करीत. मात्र करोनामुळे हे चित्र पूर्णपणे बदलले. संपूर्ण कुटुंबाचे दैनंदिन व्यवहार इंटरनेटद्वारे होऊलागले. नेटशिवाय पानही हालणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या एजन्सींना आपल्या सेवांची क्षमता वाढवावी लागली. पूर्वी घरगुती वापरासाठी नागरिक पाच, दहा किंवा पंधरा ‘एमपीबीएस’ वेगाचे पर्याय निवडीत. आता कार्यालयाचे काम करावे लागत असल्याने ५० ते १०० एमपीबीएस क्षमतेची इंटरनेट जोडणी घेऊ लागले असल्याची माहिती अंबरनाथ येथील स्ट्रार ब्रॉडबँन्ड कंपनीचे हरीश शेलार आणि रविंद्र ठाकरे यांनी दिली.

भल्या पहाटे देखभाल
करोना पूर्व काळात एखाद्याा दिवशी काही तासांचा शट डाऊन घेऊन यंत्रणेची देखभाल दुरूस्ती करता येत होती. आता मात्र तसे करता येत नाही. रात्री उशिरा किंवा पहाटे शट डाउन घ्यावा लागत असल्याचे हरिश शेलार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे करोनामुळे लोकांच्या घरी जाण्यास अडचणी असल्याने काही प्रॉब्लेम झाल्यास व्हिडीओ कॉलेद्वारे ग्राहकांना मदत करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
    
व्याप वाढला, तरीही चोख सेवा
गेल्या चार महिन्यात ग्राहक आणि कामाचा व्याप वाढला आहे. मात्र आम्ही आमच्या तंत्रज्ञांकडून ग्राहकांना चोख सेवा देत आहोत. याकाळात इंटरनेट जोडण्यांशी संबंधित यंत्रणांचे दर वाढले, मात्र आम्ही त्याचा भार ग्राहकांवर टाकलेला नाही. शहरात इंटरनेट सेवा पुरवविण्याचा कोणताही परवाना नसताना अनेकजण अनधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत. कोणताही कर न भरता ही मंडळी व्यवसाय करीत असल्याने सरकारचे नुकसान करीत आहेतच, शिवाय आमच्यासारख्या प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यावर अन्याय होत असल्याचे साईनेटच्या अनिल गायकवाड यांनी सांगितले.

 1,320 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.