आम आदमी पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कल्याण : परप्रांतीयांना ज्याप्रमाणे त्यांच्या गावाला जाण्यासाठी सरकारने मोफत रेल्वे आणि एसटी बसची सोय केली होती त्याचप्रमाणे येणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांसाठी मोफत एसटी बस आणि रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी आम आदमी पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन आपचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी मुख्यमंत्र्याना दिले असल्याची माहिती रविंद्र केदारे यांनी दिली.
लवकरच लोकप्रिय असलेला गणेशोत्सव येऊ घातला आहे. महाराष्ट्रात, विशेषतः कोकणात गणेशोत्सव हा भावनिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा सण मानला जातो. मुंबईत स्थायिक झालेला कोकणी माणूस, अर्थात चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातो. प्रशासनाकडून त्यांच्यासाठी दरवर्षी ज्यादा बिशेष एसटी बसेस, जादा रेल्वेगाड्याही सोडल्या जातात.
मात्र करोनाच्या संकटाने यंदा सर्व उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. लाखो नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्याने बेकारीची कुन्हाड कोसळली आहे. कारखान्यातील मालाला उठाव नसल्याने अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. या सर्वांमुळे सर्वसामान्य कुटुंबाना उदरनिर्वाह करणे कठीण झालेले आहे. कितीही अडचणी येवो, मात्र गणेशोत्सवाचा सण चुकवायचा नाही, असा कोकणी माणसाचा निर्धार असला, तरी गावी जाण्यासाठी आज हातात पैसाच नसल्याने कोकणी माणसाची भावनिक कोंडी झाली आहे.
ही बाब लक्षात घेता यंदा गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी जादा बसेस सोडतानाच त्या पूर्णतः मोफत सोडण्यात याव्यात. खासगी ट्रॅव्हलकडून कोकणात जाण्यासाठी बस सोडण्यात येत असून ते प्रती प्रवासी ३ ते ४ हजार रुपये असे मनमानी भाडे आकारले जात असून ते या संकटकाळात कुणालाही परवडणारे नाही. त्याचप्रमाणे कोकण रेल्वेने देखील गणेशोत्सव काळात विशेष मेल-एक्प्रेस गाड्या सोडताना त्या मोफत सोडण्याबाबत आपण प्रयत्न करावेत.
मध्यंतरी परराज्यातील नागरिकांना मुंबई-महाराष्ट्रातून त्यांच्या गावी उत्तर भारतात वा अन्यत्र सोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाने मोफत रेल्वेगाड्या व एसटी बसेस सोडल्या होत्या, त्याच धर्तीवर यंदाचे कोरोनाचे संकट पाहता कोकणी चाकरमान्यांना गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस आणि रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी आम आदमी पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
507 total views, 1 views today