बिकट परिस्थिती असणाऱ्या दुर्गम भागातील कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देण्याचे काम एप्रिल महिन्यापासून संस्थेच्या पुढाकाराने आहे सुरू
अंबरनाथ : मुरबाड तालुक्यातील काही गावे दत्तक घेऊन तिथे आरोग्य आणि शिक्षणविष़यक उपक्रम राबविण्याचे कार्य अंबरनाथ येथील स्पंदन फाऊंडेशनने गेली काही वर्षे सातत्याने सुरू ठेवले आहे. यंदा कोरोना संचारबंदीमुळे त्या गावांमध्ये मदतकार्य आम्ही करू शकलो नाही, मात्र संस्था ज्या गावांमध्ये काम करते, त्यापेक्षा अधिक बिकट परिस्थिती असणाऱ्या दुर्गम भागातील कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देण्याचे काम एप्रिल महिन्यापासून संस्थेच्या पुढाकाराने सुरू असल्याची माहिती स्पंदन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राहुल चौधरी यांनी दिली. या कार्यात अनेक दात्यांनी मदतीचा हात दिला आहे. अलिकडेच ‘सिद्धार्थ कम्पॅशन ट्रस्ट- बुद्धिस्ट कम्युनिटी’ या संस्थेने दिलेल्या निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे ५० संच टोकावडे परिसरातील गरजू कातकरी कुटुंबांना दिले. त्यावेळी असे लक्षात आले की, पावसाळ्याच्या या काळात बहुतेक सर्वच कातकरी समाजाची परिस्थिती बिकट आहे. त्यांच्या घरांमध्ये शिजवून खाण्यासाठी फारसे काही नाही. शासन मोफत तांदुळ देते, मात्र इतर धान्याचा त्यांच्या घरी अभाव आहे. हि परिस्थिती लक्षात घेऊन ‘स्पंदन’च्या वतीने मुरबाड तालुक्यातील टोकावडे-वैशाखरे परिसरातील ३०० कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे संच देण्याची मोहीम ‘स्पंदन’ने हाती घेतली आहे. पुढील दोन महिने (ऑगस्ट, सप्टेंबर) स्थानिक कार्यकर्त्यामार्फत प्रत्येक पाड्यांवर जाऊन ही मदत दिली जाणार आहे. सोबत कँल्शिअम सीरप दिले जाणार आहे. ‘स्पंदन’च्या प्रत्येक उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देत असता. यावेळीही तो द्याल. असा विश्वास डॉ. राहुल चौधरी यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात ९८९०१९४१९४ या व्हॉटस्अॅप क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ.राहुल चौधरी यांनी केले आहे.
496 total views, 1 views today