राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांचा पुढाकार
बदलापूर : बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष व गटनेते कॅप्टन आशिष दामले यांच्यातर्फे बदलापूर शहरातील पालिकेच्या ३०० सफाई कर्मचाऱ्यांची मोफत अँटीजन तपासणी करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही तपासणी करण्यात येणार आहे. बदलापूर नगरपालिकेला ३०० किट उपलब्ध करून देणार असल्याचे कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले.
बदलापूर शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सफाई कामगार महत्वाची भुमिका बजावत आहेत. नियमित स्वच्छता ठेवताना पावसाच्या काळात सफाई कर्मचारी हे कोरोना संकट काळात देखील आपली सेवा बजावत आहेत. मात्र त्यांची अद्याप पर्यंत स्वॅब टेस्ट किंवा इतर तपासणी झाली नाही. त्यामुळे फ्रन्टलाइन वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अँटीजन टेस्ट करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांंचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे आदेश अजितदादांनी दिले आहेत. तथापि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील सफाई कामगारांची तपासणी करून यंदा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे आशिष दामले यांनी सांगितले.
450 total views, 1 views today