व्यक्तीच्या आरोग्यासह राष्ट्र व धर्म यांच्या स्थितीकडेही लक्ष देऊया – डॉ. चारूदत्त पिंगळे

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गुजरात येथील डॉक्टरांचा ‘ऑनलाईन’ परिसंवाद

मुंबई :   समाज आणि राष्ट्र यांची सद्यस्थिती भय, असुरक्षितता, भ्रष्टाचार आदी अनेक आघातांमुळे बिघडली आहे. ‘शरीरात येण्याआधी आजार व्यक्तीच्या मनात येतो’, असे होमिओपॅथी उपचारात सांगितले आहे. व्यक्तीचे आरोग्य हे त्याच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर अवलंबून असते. त्यामुळे केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करण्यासह व्यक्तीच्या सामाजिक अन् आध्यात्मिक आरोग्याचाही विचार करायला हवा. म्हणूनच राष्ट्र आणि धर्माच्या स्थितीचा अभ्यास केल्याशिवाय समाजात रहाणार्‍या व्यक्तीच्या आरोग्याचा विचार करता येणार नाही. त्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यासह राष्ट्र आणि धर्म यांच्या स्थितीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी ‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये सहभागी डॉक्टरांना केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गुजरात येथील डॉक्टरांसाठी आयोजित या परिसंवादामध्ये ‘राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती अन् डॉक्टरांचे योगदान’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
  या परिसंवादामध्ये १०० डॉक्टर सहभागी झाले होते. वैद्यकीय उपचारांना अध्यात्माची जोड कशी द्यावी, त्याचा लाभ कसा होतो आदी विविध शंकांचे निरसन या परिसंवादातून करण्यात आले. शंखनाद, वेदमंत्रपठण आणि प्रार्थना यांनी परिसंवादाला प्रारभं झाला. पुणे येथील डॉ. ज्योती काळे यांनी परिसंवादाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई येथील डॉ. ममता देसाई यांनी केले.

आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनाविना पर्याय नाही – डॉ. सायली यादव
  ‘आपत्कालीन परिस्थिती आणि ताणतणाव यांवरील उपाययोजना’ या विषयावर मार्गदर्शन करतांना मुंबई येथील डॉ. सायली यादव म्हणाल्या, सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हतबल झाले आहेत. जागतिक स्तरावरील विचारवंत ‘जगात केव्हाही युद्ध भडकू शकेल’, अशी शक्यता व्यक्त करत आहेत. मानवनिर्मित प्रलयासह नैसर्गिक प्रलयांच्याही प्रकोपाला समाजाला सामोरे जावे लागत आहे. संत द्रष्टे असतात. अनेक संतांसह सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन सर्वांना साधना करण्याचे आवाहन केले आहे. भगवंताची कृपा असेल, तर या आपत्काळापासून आपले रक्षण होऊ शकेल. यासाठी ‘नामस्मरण’ ही साधना सांगितली आहे. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनीच साधना करणे आवश्यक आहे.
   हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक  सुनील घनवट यांनी या वेळी प्रथमोपचार, वैद्यकीय उपक्रम, आरोग्य शिबिरे आदी उपक्रमांच्या माध्यमातून समाजकार्यात सहभागी व्हावे, तसेच आध्यात्मिक बळ प्राप्त होण्यासाठी साधना करावी, असे परिसंवादामध्ये सहभागी डॉक्टरांना आवाहन केले. यादृष्टीने १५ दिवसांतून ‘कॉन्फरन्स कॉल’ द्वारे एकत्र येण्याच्या केलेल्या आवाहनाला डॉक्टरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 533 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.