कोविड-१९ औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांची तक्रार नोंदवा या क्रमांकावर

पर्यायी औषधे वापरा – अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

मुंबई : कोविड-१९ या कोरोना विषाणूच्या आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी त्यांचा तुटवडा भासू नये या साठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे विशेष लक्ष ठेऊन आहेत. सातत्याने अधिकाऱ्याच्या, पुरवठादारांच्या बैठका घेऊन ते आढावा घेत आहेत. तर रुग्णालय, फार्मसी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करित आहेत. कोविड -१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक उपाय योजना आखल्या जात आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा काळाबाजार होणार नाही यासाठी देखील विशेष दक्षता घेण्यात येत आहे. या औषधाच्या काळाबाजारी बाबत काही माहिती असल्यास ती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर देण्यात यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे प्रामुख्याने रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या औषधांची बाजारात अवाजवी दर आकारणी व साठेबाजी होत नसल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खात्री करावी व असे आढळून आल्यास संबधित विरुध्द कडक कारवाई करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले.
या दोन्ही औषधाचा राज्यात तुटवडा होत असून काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या, या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांनी दोन्ही औषधांच्या उत्पादक व वितरक तसेच अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उत्पादक व वितरक कंपन्यानी त्यांचे वितरक राज्यभरात वाढवावीत तसेच उत्पादन व आयात वाढवावी अशा सूचना त्यांनी केली.
रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या दोन औषधांचे उत्पादक, आयातदार फक्त दोनच कंपन्या आहेत. त्यांचे उत्पादन राज्याबाहेर होते. रेमडेसीवरचे उत्पादन हेटेरो हेल्थकेअर, हैद्राबाद येथे होते. तर सिपला कंपनी गोव्यात उत्पादन करते. टोसीलीझुमॅबची आयात मे.रोश कंपनी करते तर मे.सिपला ही कंपनी वितरण करते.
पर्यायी औषधांचा सल्ला
टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) चे पर्यायी औषध ईटियोझुलॅब Itiozulmab हे मे. बायोकॉन (Biocon) या कंपनीने बाजारात आणले आहे. टोसीलीझुमॅब(Tocilizumab Inj) ची आयात मर्यादित असल्याने रुग्णाची हेळसांड होवू नये यासाठी उपचार करताना ईटियोझुलॅब (Itiozalmab) या पर्यायी औषधाचा वापर डॉक्टरांच्या सल्याने करावा असे ही डॉ. शिंगणे यांनी सांगितले आहे.
उपलब्ध औषधांची यादी प्रसिद्ध
महाराष्ट्रात मिळणाऱ्या या औषधाचा तपशील तसेच वापर, विक्री चे तपशील घेण्याबाबत डॉ. शिंगणे यांनीअधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दर दिवशीच्या तपशीलावर ते स्वत: नजर ठेवून आहेत. तसेच गरजु रुग्णांना औषध कुठे उपलब्ध आहे याबाबत वितरकांची दी प्रसिध्द केली असून औषधे उपलब्ध करुन देण्यास मदत करण्याचे काम अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केले जात आहे.
प्रत्यक्ष भेट आणि तपासणी
गेल्या आठ दिवसात जवळपास १०-११ रुग्णालयातील औषधी वितरण केंद्रांना डॉ. शिंगणे यांनी प्रत्यक्ष भेट देवून काळाबाजार किंवा जास्त किंमत आकारणी बाबत स्वत: चौकशी केली. प्रत्येक रुग्णालयातील फार्मसीमध्ये Tocilizumab या इंजेक्शनची विक्री एम आरपीवर न करता फक्त माफक नफा ठेवून ग्राहकांना, रुग्णांना करावी असे आवाहन केले. ज्याला प्रतिसाद देऊन मुंबई व ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पीटल, भायखळा फार्मसी, मे.एस.के.एजन्सीज व सैफी रुग्णालय यांच्याकडून Tocilizumab माफक दरात विक्री केली जाते आहे. उत्पादक, आयातदार जास्तीत जास्त साठा जास्त रुग्ण असलेल्या क्षेत्रात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
काळाबाजार प्रकरणी एफ आय आर
रेमडीसीवर या औषधाची काळाबाजारी करण्याचे एक प्रकरण आढळून आले असून संबधित विरुध्द पोलिसात प्रथम खबर अहवाल नोंदविण्यात आला आहे व दोन आरोपीस अटक करण्यात प्रशासन व पोलिसांना यश मिळाले आहे. डॉ. शिंगणे स्वत: पूर्ण बारकाईने परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
नविन उत्पादन सुरु- औषध पुरवठ्यात वाढ
येत्या आठवडयात मे.मॉयलान ही कंपनी रेमडेसीवीर इंजेक्शन बाजारात आणणार आहे तसेच मे.हेटेरो हेल्थकेअर, गुजरात येथील नवसारी येथे उत्पादन लवकरच सुरु करणार आहे. मे. सिपला ही सुध्दा गुजरात येथे उत्पादन सुरु करण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे वरील औषधांच्या पुरवठयात वाढ होणार आहे.
औषधे वैद्यकीय सल्ल्याने घ्यावीत
तुटवडा असलेल्या या दोन्ही औषधाचा वापर आयसी एम आर च्या सूचना विचारात घेऊन वैद्यकिय सल्याने अत्यावश्यक, गंभीर रुग्णासाठी करण्यात यावा अशी सूचना डॉ. शिंगणे यांनी आरोग्य मंत्री, राजेश टोपे यांना केली आहे. त्यांनी सदर बाब डॉक्टरांच्या टास्क फोर्स मार्फत अमलात आणण्यात येईल असे आश्वासित केले.

 369 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.