लॉकडाऊन विरोधात सोमवारी गटई कामगारांचे धूर आंदोलन


भिक मागून पालिका मुख्यासमोर चुलीवर अन्न शिजवणार

ठाणे : ठाणे जिल्ह्यात वारंवार लॉकडाऊन करण्यात येत असल्याने हातावर पोट असणार्‍यांची आता उपासमार होऊ लागली आहे. चप्पल आणि छत्री दुरुस्ती करुन पोट भरणार्‍या वर्गाचे गटई स्टॉल दोन तासांसाठी सुरु करण्याची मागणी करुनही प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त झालेल्या गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी ‘धूर आंदोलनाचा’ इशारा दिला आहे.
राजाभाऊ चव्हाण यांनी या संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार,  सबंध देशामध्ये २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. कोरोनावर मात करणेसाठी या लॉकडाऊनची गरज होती. याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात ठाणे शहरात हातावर पोट असणार्‍यांची ङ्गपोटंफ रिकामी राहू लागली आहेत. दिवसभर गटई स्टॉलवर बसून चप्पल दुरुस्ती, छत्री दुरुस्ती करुन गटई कामगार आपला आणि आपल्या कुटुंबियांचा चरितार्थ चालवित आहे. मात्र,  २२ मार्चपासून गटई स्टॉल बंद करण्यात आलेले असल्याने गटई व्यवसाय करणार्‍यांच्या उदरभरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे ठाणे शहरात मद्यविक्री सुरु करण्यात आलेली आहे. अनेक लॉज सुरु करण्यात आलेले आहेत. अशा स्थितीमध्ये केवळ गरीबांच्या पोटावरच पाय देण्याचा प्रयत्न  केला जात आहे.
गटई कामगारांच्या स्टॉलवर कधीच गर्दी होत नसल्याने फिजीकल डिस्टन्सींगचेही पालन योग्य रितीने होऊ शकते. तरीदेखील गटई स्टॉल उघडण्यास मनाई करण्यात येत असल्याने या वर्गाची उपासमार होत आहे. त्यातच या स्टॉलचा कर, वीजबिल भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. ही सक्ती रद्द करुन वीजबिल आणि मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी करुन  १९ जुलै २०२० पर्यंत या मागण्यांवर निर्णय न घेतल्यास २० जुलै रोजी सकाळी ११वाजता शेकडो चर्मकार बांधव भिक मागून आणलेला शिधा ठामपा मुख्यालयासमोर चूल पेटवून शिजवतील तसेच याच ठिकाणी ठाण मांडून बसतील, असा इशारा राजाभाऊ चव्हाण यांनी दिला आहे.

 465 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.