पहिल्या महिला निवडणूक आयुक्त, साहित्यिक नीला सत्यनारायण यांचे निधन

कोरोना विषाणूमुळे मृत्यू : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शोक

मुंबई : राज्याच्या पहिला महिला निवडणूक आयुक्त ठरलेल्या आणि आपल्या आगळ्यावेगळ्या कवितांमुळे साहित्य क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचे आज पहाटे ४ निधन झाले. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सनदी अधिकारी म्हणून काम करताना आपल्या रूक्ष कामकाजातही त्यांनी आपली संवेदनशीलता जपत मनातील भावनांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले. तसेच त्या स्तंभलेखनही करत होत्या. तसेच त्यांच्या कार्यशैलीमुळे त्या सर्वचस्तरात लोकप्रिय ठरल्या होत्या. सत्यनारायण यांनी १५० हून अधिक कविता, मराठी-हिंदी-इंग्रजी भाषेत पुस्तके लिहीली. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटही तयार झाले. तर काही मराठी, हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शनही केले.
सनदी अधिकारी म्हणून त्यांनी ३७ वर्षे सेवा बजावली. या काळात त्यांनी मुलकी खाते, गृह खाते, वन विभाग, माहिती व प्रसिध्दी, वैद्यक, समाजकल्याण, ग्रामविकास सारख्या खात्याच्या सचिव पदाची धुरा सांभाळली होती.

नीला सत्यनारायण यांची पुस्तके
आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर), आयुष्य जगताना, एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन), एक पूर्ण – अपूर्ण (आत्मचरित्रपर), ओळखीची वाट (कवितासंग्रह), जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव), टाकीचे घाव, डेल्टा १५ (प्रवासवर्णन), तिढा (कादंबरी), तुझ्याविना (कादंबरी), पुनर्भेट (अनुभवकथन)
मी क्रांतिज्योती (अनुभवकथन), मैत्र (ललित लेख), रात्र वणव्याची (कादंबरी)
सत्य कथा (व्यवसाय मार्गदर्शन) .

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वाहीली आदरांजली

प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच साहित्य-कला क्षेत्रातही कामगिरीची मोहोर उमटविणारे अनुभवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नीला सत्यनारायण यांना महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. मुंबईत मराठी कुटुंबात जन्मलेल्या नीला सत्यनारायण या महाराष्ट्रातील अनेक युवकांसमोर प्रशासकीय सेवेविषयीच्या प्रेरणास्थान होत्या. निवडणूक आयोगाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासारखी त्यांची इतरही अनेक कामे वैशिष्ट्यपूर्ण होती.
-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी त्या मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांच्या निधनाने आपण एका कुशल प्रशासकाला, संवेदनशील साहित्यिकाला मुकलो आहोत.
– उपमुख्यमंत्री अजित पवार

 590 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.