कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू झाले चित्रीकरण

छोट्यामोठ्या कलाकारांसह तंत्रज्ञांचा जीव भांड्यात

मुंबई (अजय निक्ते ) : लाईट , साऊंड , कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन , हे शब्द ऐकायला आता सर्वच लहान मोठ्या कलाकारांचे कान आसुसले आहेत. सरकारने सुरक्षिततेची सर्व बंधन पाळून काही अटी शर्थीवर चित्रीकरणासाठी परवानगी दिली, मात्र काही ठिकाणी शूट सुरू झाल्यानंतर , सर्व प्रकारची काळजी घेऊन देखील कलाकारांना किंवा युनिट सदस्यांना काही दिवसांनी कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा काळजीचे ढग आले आहेत.
अत्यंत गाजत असलेली बालाजी टेलफिल्म्स ची हिंदी सिरीयल , ‘कसोटी जिंदगी की २ ‘चा मुख्य कलाकार पार्थ समाथनला शूटिंग सुरू झाल्यानंतर थोड्याच दिवसात कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी लक्षात आले आणि चित्रीकरण परत बंद करण्यात आले.. त्यामुळे शासनाच्या परवानगी नंतर आणि सर्वप्रकारची काळजी घेतल्यानंतरही कलाकारांना , युनिट सदस्यांना त्रास होतोय हे लक्षात घेतले पाहिजे. देशाचे आणि समाजाचे अर्थचक्र सुरू राहणे गरजेचे आहेच. छोटे मोठे कलाकार , कॅमेरा , लाईट , मेकअप ,केटरिंग, स्पॉट बॉय , साऊंड अशा विविध टेक्निकल विभागात काम करणारे सदस्य , या सर्वांनाच आता चार महिन्यांपेक्षा जास्त काळ घरी बसून राहावे लागले आहे. ए प्लस आणि ए कॅटेगरी मधील कलाकार , तंत्रज्ञ , पडद्याआड भूमिका बजावणारे इतर सदस्य यांनी त्यांची संसारगाडी या चार महिन्याच्या कालावधीत हाकली आहे , मात्र त्यांच्या व्यतिरिक्त या मनोरंजन क्षेत्रातील बहुतांश सर्वांनाच आता या परिस्थितीचा सामना करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
ज्या प्रॉडक्शन संस्थानी त्यांच्या चित्रपटाच्या, सिरियल्सच्या , वेब सिरीजच्या , आणि अशा विविध प्रकारच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे , त्या सर्वांच्या वतीने शासनाचे आभार मानणे हे आवश्यकच आहे. पण त्याच जोडीला या सर्वच चित्रिकरण स्थळी प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. निर्माता आणि त्याची संस्था आपली सर्वांची काळजी घेईलच , पण आपण प्रत्येकाने कटाक्षाने स्वतःची काळजी घेणे आत्यंतिक गरजेचे आहे. आपण सर्वांनी मिळून शासनाला आणि आपल्या प्रॉडक्शन हाऊसला सक्रियपणे साथ देणे , कोरोनाच्या संसर्गापासून आपणा सर्वांचा बचाव करण्यासाठी पुढाकार घेणे , शूटिंगच्या ठिकाणी स्वतःची काळजी घेणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे.
यापूर्वी , राज्यात किंवा देशात कधीही भूकंप , महापूर असे कुठलेही संकट आले तर नेहमीच फिल्म आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री राज्यातील आणि देशातील नागरिकांसाठी धावून गेली आहे. या इंडस्ट्रीतील दिग्गजांनी काढलेल्या मायानगरी मुंबापुरी मधील मोठया मोठया रॅलीज या सर्वांच्याच स्मरणात आहेत.
पण आजचे संकट वेगळे आहे , त्या मध्ये लोकांची तीन घटका करमणूक करणारे कलाकार आणि तंत्रज्ञ देखील बाधित झाले आहेत , त्यामुळे एकमेकांना साथ देत , एकमेकांची काळजी घेतच या संकटावर आपल्याला मात करायला लागणार आहे.
या फिल्म आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधील प्रत्येक जण आलेल्या संकटावर निश्चितच मात करेल अशी खात्री आहे.
चला तर मग ,जगभरातील लोकांची करमणूक करणाऱ्या या एंटरटेनमेंटरुपी मनोरंजन देवतेला मुजरा करून , सुरक्षीत चित्रीकरणासाठी पुनःश्च हरी ओम म्हणूया…
( लेखक अभिनेते , पत्रकार आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत)

 869 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.