भारतीय मजदूर संघाचे “सरकार जगावो अभियान”

२४ ते ३० जुलै  या काळात जिल्हा मुख्यालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती आणि विविध औद्योगिक वसाहतीत विविध प्रकारची आंदोलने करणार

कल्याण : कामगारांच्या विविध प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी २४ ते ३० जुलै  या काळात भारतीय मजदूर संघाच्या वतीने राज्यभर सरकार जगावो अभियान राबवण्यात येणार आहे. या काळात जिल्हा मुख्यालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती आणि विविध औद्योगिक वसाहतीत विविध प्रकारची आंदोलने करण्यात येतील. तसेच विविध सार्वजनिक उद्योगांच्या समोर निदर्शने करण्यात येतील. या काळात तळागाळातील प्रत्येक कामगारापर्यंत संपर्क करून केंद्र व राज्य सरकारची धोरणं आणि त्याचे कामगारांवर होणारे परिणाम याबाबत कामगारांमध्ये जागृती निर्माण करण्यात येईल.
८ जुलै  रोजी भारतीय मजदूर संघाची केंद्रीय कार्य समितीची व्हर्च्युअल सभा राष्ट्रीय अध्यक्ष सी. के. साजीनारायण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यात सदरचा निर्णय घेण्यात आला. १५ ते २८ जून २०२० या काळात भारतीय मजदूर संघाने विविध खासदारांना भेटून याच प्रश्नांबाबत निवेदने दिली. या कार्यक्रमास राज्यातील खासदारांनी चांगला प्रतिसाद दिला आणि संसदेत कामगार प्रश्नांबाबत आवाज उठवू असे आश्वासन दिले. त्यासाठी भारतीय मजदूर संघाने आभार व्यक्त केले. तसेच नुकत्याच झालेल्या कोळसा खाणीमधील संपास चांगले यश प्राप्त झाले. त्याबद्दल कामगारांचे आभार व्यक्त करण्यात आले.
असंघटित व प्रामुख्याने स्थलांतरित (मायग्रंट) कामगारांचे प्रश्न, कोरोना लोक डाऊन च्या काळात कामगारांना न मिळालेले वेतन, कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर झालेली कामगार कपात व वाढलेली बेरोजगारी, चार राज यांनी सर्व कामगार कायद्यांचे केलेले निलंबन आणि तसेच कामाचे तास ८ वरून १२ पर्यंत वाढवण्याचा निर्णय, सार्वजनिक उद्योगांचे अनिर्बंध खासगीकरण आणि विदेशी गुंतवणूक, रेल्वे डिफेन्स या उद्योगांचे खाजगीकरण निकामीकरण या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकार जगाओ अभियानाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
या अभियानात जास्तीत जास्त संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे व सरकारला आपले कामगार विषयक धोरण बदलण्यास बाध्य करण्यासाठी हे कार्यक्रम यशस्वी करावे असे आवाहन भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश व ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.

 500 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.