कल्याण ग्रामीण भागात आदिवासींच्या जमिनीवर भूमाफियांचा कब्जा
जिल्हाधिकाऱ्यांची स्टे ऑर्डर असतानाही बांधकाम
कल्याण : लॉकडाऊन असतानाही कल्याण तालुका ग्रामीणच्या वरप, कांबा परिसरात आदिवासींच्या जमिनीवर भूमाफियांकडून बेकायदा इमले बांधण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी यांची स्टे ऑर्डर असतानाही आदिवासींना दमदाटी करून बांधकामे सुरू आहेत.ही बांधकामे पाडून भूमाफियावर कारवाई करावी अशी मागणी परिहिट चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे
वरप, कांबा गावातील आदिवासींची जमीन कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या काहींनी बोगस शेतकरी दाखले काढून लाटल्या आहेत. याबाबत दिल्लीतील अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे परिहिट चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यांनी तक्रार केल्यानंतर आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सदर जागेबर बांधकाम करण्यास मनाई आदेश लागू केला.मात्र भूमाफियांनी खोटे शेतकरी दाखले तयार करून बांधकाम सुरू केल्याची बाब गुप्ता यांनी उघड केली आहे. मुळात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग दिल्ली येथे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कोरोनामुळे सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने लॉकडाऊन असतानाही घाई, गडबडीत बांधकाम पूर्ण करण्याचा प्रकार सुरू आहे.हे बेकायदा बांधकाम तत्काळ बंद पाडावे आणि आदिवासींच्या जमिनीचे संरक्षण करावे, अशी मागणी गुप्ता यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्याकडे केली आहे.
599 total views, 2 views today