राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी एका व्हिडिओद्वारे ठाणे शहरातील वस्तुस्थिती मांडल्याबद्दल नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मानले आभार
ठाणे : ठाणे शहरातील वस्तुस्थिती पालकमंत्र्यांनी जाणून घ्यावी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बेड मिळत नाही, औषधांचा काळाबाजार अशी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार म्हणजे राज्य सरकार व महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मिळालेला ‘घरचा आहेर’ आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार व सत्ताधारी शिवसेना व प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचा भाजपचा आरोप १०० टक्के खरा होत आहे, असे मत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी एका व्हिडिओद्वारे ठाणे शहरातील वस्तुस्थिती मांडल्याबद्दल नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आभार मानले आहेत. माजी खासदार आनंद परांजपे यांनी शहरातील वस्तुस्थिती जाणून घेण्याचे पालकमंत्र्यांना आवाहन केले आहे. त्याचबरोबर बेड मिळवण्यासाठी होणारी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ, ३० हजारांच्या औषधांचा एक लाख रुपयांपर्यंत होणारा काळाबाजार, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बेड मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या आहेत त्याचबरोबर संपूर्णपणे प्रशासनावर विसंबून राहू नका,असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपावरून ठाणे शहरातील स्थिती पुन्हा एकदा प्रकाशात आली. या संदर्भात भाजपाकडून सातत्याने आवाज उठविला जात आहे. ग्लोबल हब हॉस्पिटल, क्वारंटाईन सेंटर येथील
गैरव्यवस्था, खाजगी हॉस्पिटलांची लूटमार याकडे लक्ष वेधले जात होते. मात्र , त्याकडे दुर्लक्ष केल्याने ठाणे शहर धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेली वस्तुस्थिती तरी समजून शिवसेना व प्रशासनाने कामाला लागावे. अन्यथा, जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी दिला आहे.
940 total views, 1 views today