प्रशासनामुळेच होत आहेत कोरोनाग्रस्तांचे हाल

पालकमंत्र्यांना प्रशासनाकडून खोटी माहिती दिली जातेय, आनंद परांजपे यांचा आरोप

ठाणे : सध्या ठाणे शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. मृतदेह बदलण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराला ठाणे महानगर पालिकेचे प्रशासनच जबाबदार आहे. पालकमंत्रीदेखील थेट रस्त्यावर न उतरता प्रशासनावर विश्वास ठेऊन शांत बसले आहेत. त्याचा त्रास नाहक ठाणेकरांना सहन करावा लागत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यास होणारी टाळाटाळ; मृतदेहांची आदलाबदल, ग्लोबल हब कोविड सेंटरमधील अनागोंदी या सर्व प्रकारावर आनंद परांजपे यांनी संताप व्यक्त केला.
आनंद परांजपे यांनी सांगितले की, सध्या ठाणे शहरात प्रशासनाची एकाधिकारशाही सुरु आहे. कोविड सेंटर्समधील डॉक्टरांच्या आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या मनात येईल. त्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत. गोरगरीबांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. ठाणे पालिकेने रुग्णालयातील बिलांसाठी ऑडीटर नेमण्याची घोषणा केली असली तरी डिपॉझीट घेतल्याशिवाय रुग्णांना दाखल करुन घेतले जात नाही. लाखो रुपयांची बिले दिली जात आहेत. पालिकेने नेमलेल्या नोडल अधिकार्‍यांमध्ये समन्वय नाही. परिणामी, पालिकेचे पत्र नसल्याचे कारण सांगून अनेक रुग्णालये रुग्णांना दाखल करुन घेत नाहीत. महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ देण्यासही रुग्णालय प्रशासन तयार नाही. तर, ग्लोबल हब येथे वैद्यकीय अधिकारी मृत रुग्णाला बेपत्ता दाखवित आहेत. अन् पालकमंत्र्यांना हे प्रशासन चुकीची माहिती देत आहेत. एकंदर पालकमंत्र्यांना गंडविण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकार्‍यांकडून सुरु असून त्यामुळे नाहक सरकारला बदनामी सहन करावी लागत आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरुन काम केले तरच या शहरातील ही महामारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांची मुजोरी संपुष्टात येईल, असेही परांजपे यांनी म्हटले आहे.

 595 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.