धनंजय मुंडे कोरोना ब्रेकनंतर पुन्हा बॅक टू वर्क

सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रालयीन कामकाजाचा घेतला आढावा

मुंबई : कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आज मंत्रालयात कामावर परत रुजू झाले. मंत्रालयातील त्यांच्या दालनात परतताच त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
धनंजय मुंडे हे जून महिन्यात कोरोना बाधित असल्याचे आढळल्यानंतर जवळपास २५ दिवस रुग्णालय व त्यानंतर होम क्वारंटाईन होते. या दरम्यानही त्यांच्या कामांचा सपाटा सुरूच होता.
मुंडे दर महिन्याला  विभागामार्फत, पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात तसेच त्यांच्या परळी या मतदारसंघात केलेल्या कामकाजाचा आढावा पक्षश्रेष्ठी व जनतेसमोर मांडतात. रुग्णालयात कोरोनावरील उपचार घेत असताना देखील त्यांनी ही परंपरा कायम राखत आपला कार्य अहवाल थेट रुग्णालयातून सादर केला होता.
तसेच होम क्वारंटाईन असताना त्यांनी घरून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रिमंडळ बैठकीतही हजेरी लावली होती. सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी यांच्याही ते सातत्याने संपर्कात होते.
दरम्यान आज मुंडे यांनी मंत्रालयात उपस्थित राहून विभागाचे सचिव पराग जैन, समाज कल्याण आयुक्त प्रवीण दराडे, दिव्यांग कल्याण आयुक्त  प्रेरणा देशभ्रतार आदी महत्वाच्या अधिकाऱ्यांशी विविध माध्यमातून चर्चा करत कामकाजाचा आढावा घेतला.

 510 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.