मीच प्रमुख !

राज्य सरकारमध्ये प्रत्येक जण मीच प्रमुख असल्याच्या अविभार्वात असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका

ठाणे  : मुंबईतील पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांच्या गोंधळात राज्य सरकारमधील समन्वयाच्या अभावाबरोबरच मुख्यमंत्री-मंत्र्यांमधील अविश्वास उघड झाला. राज्य सरकारमधील प्रत्येक जण मीच प्रमुख असल्याच्या अविर्भावात असून, सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे, अशी प्रखर टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.
ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी आज ठाण्याचा दौरा केला. त्यांनी भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन सेंटर, ग्लोबल हब हॉस्पीटल आणि महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी आमदार रवींद्र चव्हाण, संजय केळकर, प्रसाद लाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते.
पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांची माहिती पोलिस आयुक्तांकडून गृहमंत्र्यांना दिली जाते. गृहमंत्री व मुख्यमंत्री वेगवेगळे असल्यास गृहमंत्र्यांकडून ती मुख्यमंत्र्यांना देण्याचे अपेक्षित आहे. मात्र, या बदल्यांची माहिती दिली नसल्याचे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून बदल्या थांबविण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांचा विश्वास आहे, म्हणून मंत्रिमंडळात मंत्री आहेत. पण या प्रकरणात समन्वयाचा पूर्णपणे अभाव असल्याबरोबरच मंत्र्यांमधीलअविश्वासही उघड झाला. मुख्यमंत्री-मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. या सरकारमध्ये कधी मंत्री, कधी सचिव, तर कधी अधिकारी निर्णय जाहीर करतात. काही वेळा मुख्यमंत्र्यांकडून थेट निर्णय घेतले जातात. प्रत्येकजण मीच प्रमुख असल्याच्या अविर्भावात आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली
एमएमआरडीए क्षेत्रामध्ये कोरोनाचे राज्यातील ७३ टक्के मृत्यू झाले असून, यंत्रणांमध्ये समन्वय नाही. कोरोना चाचण्यांची संख्या अत्यंत कमी असून, कोठे दोन दिवसांनी, तर काही ठिकाणी चार दिवसांनी रिपोर्ट येतो. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांची स्थिती गंभीर होते. त्यामुळे २४ तासांतच चाचण्यांचे निकाल यायला हवेत. त्याचबरोबर सिम्टोमॅटीक रुग्णांवर कोरोनाचे रुग्ण म्हणून उपचार व्हायला हवेत, असे फडणवीस यांनी नमूद केले. देशात सर्वाधिक चाचण्या करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण राज्य सरकारकडून चाचण्या केल्या जात नाही. सध्या चाचण्यांमध्ये दिल्लीचा प्रथम क्रमांक आहे. त्यांनी जादा चाचण्यांमधून दिल्लीतील रुग्णांची प्रकृती सुधाण्याचा वेगही वाढला. मात्र, महाराष्ट्रात मुंबई व महानगर क्षेत्रात रुग्ण संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून भविष्यात लोकांचा जीव धोक्यात टाकला जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
मराठा आरक्षण हा मुद्दा राजकारणापलीकडे असून, तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने सजग राहून प्रयत्न करावा. या प्रश्नावर भाजपाच्यावतीने याचिकाकर्ते विनोद पाटील यांना आवश्यक मदत करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
सारथी संस्था पद्धतशीरपणे खिळखिळी करून बंद करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. एखाद्या व्यक्तीने योग्य सुचना दिल्यावर तो भाजपचा, चुक लक्षात आणून दिल्यास, तो भाजपचा, अशी ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार येतील, जातील. पण संस्था टिकल्या पाहिजेत, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी संजय राऊत यांच्याकडून कपोलकल्पित सरकार पडण्याचा प्रयत्न असल्याचे लेख लिहून कोरोनाच्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित केले जाते. भाजपाला सरकार पाडण्याची कोणतीही घाई नसून, सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असे भाकितही देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यातील जनता वाढत्या वीज बिलामुळे हैराण आहे. मात्र, त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी अवास्तव व नियमात नसलेल्या मागण्या केल्या जातात. महाराष्ट्राच्या वाट्यासाठी मिळणारा ९ हजार कोटींचा निधी का घेतला जात नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना केला. महात्मा फुले योजनेमधून १ लाख २२ हजार रुग्णांवर उपचार केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही एवढी नाही. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णांच्या संख्येबाबत शंका आहे. या निमित्ताने काही हॉस्पिटलांकडून रॅकेट चालविले जाते का, याची चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
मृत्यूदर २५ टक्के जास्त
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण नव्हते. त्यावेळी मार्चमधील मृत्यूची संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत तब्बल २५ टक्के मृत्यू वाढले आहेत. मुंबईत ४०० मृत्यूंची नोंद झालेली नाही. तीच स्थिती ठाण्यात आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. ठाणे महापालिकेने ग्लोबल हब येथे उभारलेल्या रुग्णालयात व्यवस्था चांगली आहे. पण तिथे डॉक्टरांसह अन्य कर्मचारी नाहीत, अशा व्यवस्थेचा उपयोग काय, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. ठाण्यात एका कुटुंबाला रुग्णालयात दाखल केलेल्या आपल्या नातेवाईकाची दोन दिवसांनंतरही माहिती मिळत नाही. अशा चूका टाळण्यासाठी डिजिटल यंत्रणेचा वापर करावा, अशी सुचना फडणवीस यांनी केली.

 470 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.