जलसंवर्धन मोहीमेला शिक्षकांकडून ९० हजारांची देणगी

शहापूरचे भविष्य बदलण्याच्या जिद्दीने हाती घेण्यात आलेल्या या जल संवर्धन चळवळीला आपलाही हातभार लागावा या भावनेने ‘विद्याा प्रसारक’च्या शिक्षकांनी दिला निधी

शहापूर : शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील विद्याा प्रसारक मंडळ या शाळेतील मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांसह १९ शिक्षकांनी वर्गणी काढून ९० हजार रूपयांची देणगी टाकी पठार येथील फुलनाथ बाबा यांच्या वतीने सुरू असलेल्या जलसंवर्धन मोहीमेसाठी दिली आहे.
डिसेंबर महिन्यापासून फुलनाथबाबांच्या मार्गदर्शनाखाली टाकीपठार अध्यात्मिक परिवारातील भाविकांनी शहापूर तालुक्यातील ओढ्या नाल्यांमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे असूनही शहापूर तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसावते. ती दूर करण्याच्या निर्धाराने फुलनाथ बाबा यांनी गाळ उपसण्याचे काम सुरू केले आहे. या मोहीमेसाठी लागणारा संपूर्ण खर्च फुलनाथ बाबा आणि त्यांचे शिष्यगण करीत आहेत. तूर्त पावसाळ्यात ही मोहीम थांबली असली तरी दिवाळीनंतर पुन्हा हे काम हाती घेतले जाणार आहे.
तालुक्यातील अनेकजण या मोहीमेने प्रभावीत झाले आहेत. शहापूरचे भविष्य बदलण्याच्या जिद्दीने हाती घेण्यात आलेल्या या जल संवर्धन चळवळीला आपलाही हातभार लागावा या भावनेने ‘विद्याा प्रसारक’च्या शिक्षकांनी ९० हजार रूपयांचा निधी दिला. खंडूमामा विशे, विठ्ठल गगे, गोपाळ वेखंडे, पंढरीनाथ बांगर यांनी ही रक्कम फुलनाथ बाबांकडे सुपूर्द केली.

 561 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.