माझ्या त्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास करू नये – छगन भुजबळ

अभिनेता अक्षय कुमार यांच्या नाशिक दौऱ्याबाबत भुजबळांनी केले होते भाष्य

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कोविडची पार्श्वभूमी, पावसाचे वातावरण असतांना अभिनेता अक्षय कुमार यांना नाशिक मध्ये हेलिकॉप्टरची परवानगी कशी देण्यात आली ? अभिनेता अक्षय कुमार नाशिक ग्रामीण भागात आल्यानंतर त्याला नाशिक शहरातील पोलिसांचा बंदोबस्त कसा देण्यात आला ? जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती कशी नाही ? याबाबत पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याला या प्रकरणाबाबत अद्याप कुठलीही माहिती नसून अक्षय कुमार यांना परवानगी कोणी दिली याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माहिती घेतील जाईल त्यानंतरच या प्रकरणावर बोलणे उचित होईल असे सांगत माध्यमांनी मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नये असे स्पष्ट केले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिक मध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात नियोजन करण्यात येत असून आज क्रेडाई, बांधकाम व्यावसायिक जितेंद्र ठक्कर व नाशिक महापालिका यांच्या समन्वयातून नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे ३५० खाटांच्या ‘कोविड केअर सेंटर’ची निर्मिती करण्यात येत आहे. या कोविड केअर सेंटरची आज पाहणी करत असतांना उपस्थित पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार करत अक्षय कुमार यांच्या नाशिक दौऱ्याबाबत प्रश्न विचारले. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कोविडची पार्श्वभूमी, पावसाचे वातावरण असतांना अभिनेता अक्षय कुमार यांना नाशिक मध्ये हेलिकॉप्टरची परवानगी कशी देण्यात आली ? राज्याचे मुख्यमंत्री पावसाचे वातावरण असल्याने गाडीने पंढरपूर येथे गेले, राज्यातील मंत्री गाडीने फिरता आहे असे असतांना अभिनेता अक्षय कुमारला परवानगी कशी ? अभिनेता अक्षय कुमार नाशिक ग्रामीण भागात आल्यानंतर त्याच्या सुरक्षेची नाशिक ग्रामीण पोलिसांची जबाबदारी असतांना नाशिक शहरातील पोलिसांचा बंदोबस्त कसा देण्यात आला ? जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती कशी नाही ? असे प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी सदर प्रकरणाबाबत आपल्याला अद्याप कुठलीही माहिती नसून आपण जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माहिती घेऊ असे म्हटले आहे. मात्र काही काही माध्यमांनी या वक्तव्याचा विपर्यास केला असून अक्षय कुमार यांच्या नाशिक दौऱ्याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले अशा बातम्या पसरविल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आपल्याला सदर प्रकरणाबाबत माहिती दिली असून अभिनेता अक्षय कुमार हे डॉ.आशर यांच्याकडे उपचार घेत असून तपासणीसाठी ते नाशिकमध्ये आलेले होते. यावेळी अक्षय कुमार यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेल्या चांगल्या सामाजिक कार्याबद्दल नाशिकचे पोलिस आयुक्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी याठिकाणी गेले होते. त्यामुळे नाशिक शहरातील पोलिसांचा एस्कॉट हा अक्षय कुमार यांच्यासाठी नव्हे तर पोलीस आयुक्तांसोबत होता. नाशिक पोलिसांकडून त्यांना कुठलीही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात आता कुठलीही संदिग्धता राहिली नसून माध्यमांनी याची नोंद घेऊन या प्रकरणाबाबत गैरसमज पसरवू नये असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

 697 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.