चिंचपोकळीचा चिंतामणी यावर्षी मुर्ती घडवणार नाही


धार्मिक परंपरा राखून मंडळाच्या देव्हार्‍यातील पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्ती ची होणार प्राणप्रतिष्ठापना

मुंबई : गिरणगावातील १०१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठापना, पूजन हा धार्मिक विषय तर आहेच पण भक्तांच्या भावनांचा, भक्तीचा विषय आहे. दरवर्षी चिंतामणीचे लोभस रूप पाहण्यासाठी असंख्य भक्तांचे डोळे आसुसलेले असतात आणि एक भक्तिपूर्ण ओढ प्रत्येक चिंतामणी भक्ताच्या मनात असते. मंडळाने गतवर्षी शतक महोत्सव जल्लोषात, आनंदात व भक्तिभावाने साजरा केला यंदाचे मंडळाचे १०१ वे वर्ष असून मंडळाने गत १०० वर्षात सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेच व्रत अविरत केलेले आहे व गिरणगावातील एक आदर्श मंडळ म्हणून नावारूपास आलेले आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने देशात प्रसिद्ध असलेला चिंतामणीचा आगमन सोहळा,पाटपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केल्याचे आधीच जाहीर केलेले आहे. मूर्तीच्या उंचीबाबत शासन निर्णयाच्या अधीन राहून निर्णय घेण्याचे मंडळाने आधीच जाहीर केलेले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मूर्तीची उंचीबाबत बोलताना मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्वाची असे आवाहन केले याला सकारात्मक प्रतिसाद देताना, सद्य परिस्थितीत धार्मिक बाब, चिंतामणी भक्त,शासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा,जनतेचं आरोग्य या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करून मंडळाच्या आदर्शवादी भूमिकेेची जाण ठेवून मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाची धार्मिक परंपरा खंडित होऊ न देता मंडळात पुजल्या जाणार्‍या पारंंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सीताराम नाईक यांनी दिली आहे.
त्याचबरोबर मंडळाने हे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून जाहीर करतांना गणेशोत्सव काळात रक्तदान शिबीर,आरोग्य चिकित्सा, रुग्णसाहित्य केंद, शासकीय रुग्णालयास वैद्यकीय उपकरण आणि १०१ कोविड योद्धयांंचा सन्मान आदी विविध आरोग्यविषयक उपकरण राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी दिली आहे.
मंडळ या वर्षी मंडपासमोर कृत्रिम तलाव बांधून तेथे विभागातील घरगुती गणेश मूर्तीना विसर्जनासाठी उपलब्ध करून देणार आहे.
गतवर्षी पश्चिम महाराष्ट्र, कोकणात आलेल्या पुरप्रसंगी व आता कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रसंगी मंडळाने अनुक्रमे ५,००,००० रुपये व ३,५१,००० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द केलेले आहेत. लॉकडाऊन च्या काळात विभागात अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या,सॅनिटायझर आदींचे वाटप केलेले आहे तसेच निर्जन्तुनिकीकरण फवारणी करून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा या वाक्यानुसार मंडळ यावर्षी उत्सव साधेपणाने साजरा करूून जनतेचे आरोग्य जपण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

 636 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.