मुंबई ३ ते ४ शिफ्टमध्ये सुरु होणार ?


राज्य सरकारकडून चाचपणी

मुंबई : मुंबईसह महानगरात जरी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जास्त कालावधीसाठी बंद ठेवता येणार नाही. त्यामुळे मुंबई शहरातील सरकारी, खाजगी कार्यालये आणि उद्योग तीन ते चार शिफ्टमध्ये सुरु करण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे मुंबईसह राज्यातील सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे आणखी फार दिवस लॉकडाऊन ठेवून आर्थिक परिस्थिती आणखी जटील करणे अशक्य असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर शहरातील खाजगी कंपन्यांची कार्यालये सकाळी ६ वाजल्यापासून दुपारी जेवणाच्या वेळेपर्यत, तर दुपारी जेवणाच्या वेळेपासून रात्रीच्या जे‌वणापर्यंत आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणापासून ते मध्यरात्री पर्यत अशा तीन ते चार वेळांमध्ये कार्यालये सुरु केल्यास रखडलेले कामकाज मार्गी लागणे शक्य होवून आर्थिक गाडी रूळावर येण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
या शिफ्टमुळे मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी सुरु करण्यात आलेल्या उपनगरीय रेल्वेवरही प्रवाशांचा लोड येणार नाही. तसेच लोकांना आपली कार्यालयीन कामे करणे सोपे होईल असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात काही खाजगी कंपन्याशी आणि त्यांच्या कार्यालयांशी बोलणी केली असता त्यांनी यासंदर्भात बराच सकारात्मक प्रतिसाद दिला असून यातील काही जणांनी सकाळी ६ वाजल्यापासून १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करण्याची, दुपारच्या जेवणाच्या वेळेपासून रात्रीच्या जेवणाच्या कालावधीच्या काळात २० टक्के तर आणि त्यानंतरच्या रात्रीच्या वेळेत सुरु होणाऱ्या कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये चालविण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे कार्यालयात शाररीक अंतरही पाळले जाईल आणि मुंबईत होणारी गर्दीही टाळता येईल असे त्यांनी सांगितले.

 568 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.