शिक्षक दाम्पत्याचा मुलगा नितीन इंजिनिअरींगची पदवी मिळवूनही गेली तीन वर्षे स्पर्धा परीक्षा देत होता. कारण त्याला प्रशासकीय सेवेत काम करायचे होते. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी त्याने कोणताही क्लास लावला नव्हता
अंबरनाथ : आता ग्रामीण भागातील विद्याार्थीही करिअरचे विशिष्ट लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मेहनतीने यश मिळवू लागले आहेत. शहापूर तालुक्यातील खरीवली येथील नितीन हरड या मॅकेनिकल इंजिनिअरींगची पदवी मिळविलेल्या तरुणाने त्या यशावरच समाधान न मानता स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रीत केले होते. कोणताही क्लास न लावता एकलव्य पद्धतीने अभ्यास करणाऱ्या नितीनला यंदाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले आहे. ९०० पैकी ५१४ गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला असून त्याची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्याने हे यश मिळविले आहे. विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून जिद्दीने मेहनत केली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे त्याने दाखवून दिले.
किन्हवलीजवळील खरीवली येथील कांतिलाल आणि कांचन या शिक्षक दाम्पत्याचा मुलगा नितीन इंजिनिअरींगची पदवी मिळवूनही गेली तीन वर्षे स्पर्धा परीक्षा देत होता. कारण त्याला प्रशासकीय सेवेत काम करायचे होते. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी त्याने कोणताही क्लास लावला नव्हता. गावाबाहेरील जंगलातील एकांतात दररोज दहा ते बारा तास अभ्यास करून त्याने हे यश मिळविले. सातत्याने केलेला अभ्यास आणि घरच्यांचे प्रोत्साहन यामुळे मी हे यश मिळवू शकलो, अशा भावना नितीन हरड याने व्यक्त केल्या आहेत.
449 total views, 1 views today