वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविल्याचा आनंद
अंबरनाथ : मूळ किन्हवली परिसरातील सोगाव येथील आणि सध्या अंबरनाथ मध्ये वास्तव्यास असलेली श्रद्धा दिनकर बागराव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तहसीलदार होण्याचे आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. कोरोनाच्या समाचार बंदीमध्येही श्रद्धा बागराव हिच्यावर अक्षरशः अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शहापूर तालुक्यातील किन्हवली परीसरात असलेल्या सोगाव येथे जन्म झालेल्या श्रद्धा बागराव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अवघड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तहसीलदार होण्याचे वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. श्रद्धाचे दहावी पर्यंतचे शिक्षण अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले असून ११ वि व १२ वी चे विज्ञान शाखेचे शिक्षण उल्हासनगर येथील सि एच एम महाविद्यालयात झाले आहे. मुंबई माटुंगा येथील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातुन मॅकेनिकल इंजिनीयरींग शिक्षण घेत असताना तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.दिवसभरात ८ ते ९ तास अभ्यास करणाऱ्या श्रद्धाला आपल्या वडिलांचे तहसीलदार होण्याचे स्वप्न साकार करून त्यांना “श्रद्धांजली” वहायची होती. तो ही उद्देश सफल झाल्याने बागराव कुटुंबिय आनंदी आहेत.
व्यवसायाने जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेले श्रद्धाचे वडील दिनकर हरीचन्द्र बागराव यांचा १९९८ मध्ये अपघाती निधन झाल्यानंतर आई शालिनी यांनी श्रध्दाच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेतली. श्रध्दाच्या आई शालिनी या सध्या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असून श्रद्धाचे काका काशिनाथ बागराव हे गावी शेतीला जोड व्यवसाय म्हणून किराणा दुकान चालवितात.
श्रद्धा बागराव हिच्या यशाची आनंदाची बातमी मिळताच कोरोनाच्या या संचार बंदीमध्येही श्रद्धावर अक्षरशः अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, देशमुख मराठा समाज उन्नती मंडळाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळूमामा सूर्यराव, कोषाध्यक्ष नारायण हिंदुराव, सुशील देशमुख, भाजपचे उपाध्यक्ष दीपक कोतेकर, माजी सभापती सुभाष साळुंके, सुवर्ण साळुंके आदी मान्यवरांनी श्रद्धाच्या घरी जाऊन तिचे अभियानंदन केले.
“जिद्द,चिकाटी ठेवून प्रामाणिक प्रयत्न करा,यश हमखास मिळते !” असा संदेश श्रद्धा यांनी सध्याच्या युवा पिढीला दिला आहे.
644 total views, 1 views today