अन्यथा आंदोलनाला सामोरे जा

वाढीव विजेचे बिल कमी करून ग्राहकांना मुदतवाढ व हप्त्याने बिले भरण्याची मुभा द्या – आमदार मंदा म्हात्रे
                    
 
नवी मुंबई : नवी मुंबईतील वीजग्राहकांना महावितरण कंपनीने देण्यात आलेली वाढीव बिलाची रक्कम कमी करणे तसेच  बिलाची रक्कम भरण्यास मुदतवाढ व हप्त्याने भरण्याची मुभा मिळण्याकरीता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार  मंदाताई म्हात्रे यांनी एम.एस.ई.डी.सी.एल. चे वाशी विभाग कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे यांची नुकतीच त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी ग्राहकांना वितरीत करण्यात आलेले विजेचे बिल कमी करणे, संचारबंदी लागू असल्याने बिल भरण्यास मुदतवाढ देणे, बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने ग्राहकांना हप्त्या-हप्त्याने बिले भरण्याची मुभा देणे,  चुकीच्या रीडिंगने वितरित करण्यात आलेली बिले, नादुरुस्त वीज मीटर, जलदगतीने चालणारे वीज मीटर बदली करणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. ३ महिन्याचे एकत्रित बिल न देता रीडिंग घेऊन नियमाप्रमाणे प्रति महिन्याचे बिल देण्यात यावे. तसेच त्यावरील येणारे दंड,व्याज व अधिभार हे माफ करून एकूण येणारे बिल हे २४ हप्त्यांमध्ये वर्ग करून आकारण्यात यावे, अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली. तसेच सदर मागण्या त्वरित मान्य न झाल्यास भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. सदरबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व विरोधी पक्षनेते  देवेन्द्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. जो पर्यंत सदरबाबत शासनाचा धोरणात्मक निर्णय होत नाही तो पर्यंत जुन्या दराची बिले वितरीत करण्यात येऊ नयेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता  श्यामकांत बोरसे यांनी सदर सर्व मागण्या वरिष्ठांकडे मांडून पूर्ण करणार असल्याचे तसेच ग्राहकांना त्रास होईल अशी कोणतीही घटना घडणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले.
 
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि,  नवी मुंबईतील ग्राहकांना येत्या महिन्यात विजेचे वाढीव भरमसाठ रकमेची बिले वितरित करण्यात आलेली आहेत. सदर बिले मीटरची रिडींग न घेता सरासरी काढण्यात आले असल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. अनेक ग्राहकांना अवाच्या सवा रकमेची बिले आली असल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने गेले ३ महिने रोजगार नसल्यामुळे अनेक मध्यमवर्गीय नागरिकांचा पगारही झालेला नाही. अशा बिकट परिस्थितीत महावितरणने ३ महिन्याचे एकत्रित  २५००० रुपयांपेक्षा पेक्षाही जास्त रकमेची बिले वितरित केल्याने ग्राहक प्रचंड तणावाखाली आहेत. गेले ४ महिने दुकाने, कंपन्या बंद असूनही त्यांना सरासरी बिलाच्या नावाखाली अवाढव्य बिल वितरीत करण्यात आलेली आहेत. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ग्राहकांना देण्यात आलेली वाढीव बिलाची रक्कम कमी करण्यासंदर्भात तसेच वीज पुरवठा खंडित न करता सदर बिलाची रक्कम २४ हप्त्याने भरण्याची मुभा देऊन त्यांना मुदतवाढ देण्यासंदर्भात आज महावितरणच्या वाशी विभाग कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली असल्याचे आमदार  मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष  रामचंद्र घरत, माजी स्थायी समिती सभापती  संपत शेवाळे, भाजपा महामंत्री  विजय घाटे, उदयवीर सिंग, एम.एस.ई.डी. चे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे, व्यवस्थापक दिलीप तेले तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.    

 395 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.