भारतीय आयुर्वेद, योगासन व सूर्यनमस्कार व्यायाम यांचा नियमित शास्त्रशुद्ध पद्धतीने उपयोग केला तर कोरोना किंवा अन्य रोगांपासून स्वत:चा बचाव करता येईल,
डोंबिवली : येथील रेल चाईल्ड प्राथमिक शाळा व महात्मा गांधी विद्यामंदिर या शाळा वैविध्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना संस्कारमय पाठ देतात, हे आजच्या २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आॅनलाईन सादरीकरणातून दिसून आले. शनिवारी रेल चाईल्ड संस्था उपाध्यक्ष नितीन दिघे यांच्या कन्येच्या दु:खद निधनामुळे अखंड रेल चाईल्ड परिवार दु:खात असूनही आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आॅनलाईन कार्यक्रमातून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी, पालक व विद्यार्थ्यांना आरोग्याचा मूलमंत्र दिला.
प्रथम नितीशा दिघे हिला उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाच्या सुरवातीला केळकर महाविद्यालयातील प्राध्यापक व योगविद्येचे अभ्यासक सुर्यकांत खुसपे यांनी योग दिनाचा मौलिक संदेश दिला. तसेच भारतीय आयुर्वेद, योगासन व सूर्यनमस्कार व्यायाम यांचा नियमित शास्त्रशुद्ध पद्धतीने उपयोग केला तर कोरोना किंवा अन्य रोगांपासून स्वत:चा बचाव करता येईल, असे खुसपे यांनी सांगितले. रेल चाईल्ड प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ललिता कुलकर्णी यांनी योग गीत सादर केले. महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेतील शिक्षिका व योग मार्गदर्शिका सविताताई खुसपे यांनी पूरक व्यायाम, सूर्यनमस्कार, उभे राहून, बसूनची, पाठीवर व पोटावर झोपून अशी सर्व योगासने तसेच शास्त्रशुद्ध प्राणायाम उपस्थितांकडून करुन घेतला. या प्रसंगी रेल चाईल्ड संस्थेचे पदाधिकारी, शाळा समिती सदस्य, रेल चाईल्ड प्राथमिक शाळा व महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी सुमारे ७५ जण आॅनलाईन सहभागी झाले होते.
रेल चाईल्ड प्राथमिक शाळा समिती अध्यक्षा शोभा अंबरकर यांनी सर्वांचे कौतुक केले. २१ जून हा सर्वात मोठा दिवस असून या दिवसाचे पुराणात महत्त्व विषद केले आहे. सर्वांनी आजपासून नियमित सूर्यनमस्कार व योगासने करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन शोभा अंबरकर यांनी व्यक्त केले. तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेचे शाळा समिती अध्यक्ष उल्हास झोपे यांनी लाॅकडाऊन कालावधीत शिक्षक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी जे कष्ट घेत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक करुन, योगासने आणि सूर्यनमस्कार सातत्याने करण्याचे आवाहन केले. तसेच सर्व शिक्षकांनी आज केलेले योगासनांचे पाठ आॅनलाईन माध्यमातून विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे असे मत मांडले. शाळेने राबविलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम अत्यंत दर्जेदार पद्धतीने आयोजित केल्याबद्दल रेल चाईल्ड संस्थेचे माजी कार्यवाह सुरेश खेडकर यांनी कौतुकाची थाप शिक्षकांना दिली. या आॅनलाईन कार्यक्रमाला सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकांचा कृतिशील सहभाग अवर्णनीय होता. रेल चाईल्ड प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका संध्या जैन यांनी, योग दिन साजरा करण्यासाठी संस्थेने दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अंकुर आहेर यांनी, शाळेतर्फे राबविण्यात आलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमातील सहभागी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रतिक्षा व स्नेहा खुसपे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. हा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
1,519 total views, 1 views today