अंध बांधवांना कायमस्वरूपी मिळणार उत्पन्न : प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्नही मार्गी लागणार
अंबरनाथ : अंबरनाथ मध्ये असलेल्या नॅब आय डी बी आय पॉलिटेक्निक या संस्थेमध्ये स्थानिक उद्योजकांची संघटना असलेल्या ‘आमा’च्या सहकार्याने प्लास्टिक प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे अंध बांधवांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. अंध बांधवांना कायमस्वरुपी रोजगार मिळणार आहे. औद्योगिक वसाहतीमधील प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न सुटून उद्योगांना प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी प्लास्टिकचा कच्चा माल मिळणार आहे.
१९८५ मध्ये राज्य शासनाने अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये अंध बांधवांना अभियांत्रिकी उद्योगात आवश्यक असणारी कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी नॅबच्या सहकार्याने पॉलिटेक्निक सुरू करण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते याचे मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले होते. या केंद्रात राज्यभरातील ४० अंध बांधवांच्या निवासी प्रशिक्षणाची सोय आहे. याठिकाणी मशिन ऑपरेटिंग, लेथ मशिन तसेच प्लॅस्टिक मोल्डींगचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या आधारे येथील अंध बांधव अंध बांधवांना लागणारी पांढरी काठी, कापूरदाणी, कार्यालयासाठी लागणाऱ्या फाईल्स, इलेक्ट्रिक टु पीन्स आदी वस्तू बनवितात. तसेच परिसरातील कारखान्यांमधून येणारी लहान-मोठी कामे करतात. शासन त्यांना नियमानुसार विद्यावेतन देते. मात्र बाहेरील कामांमधून त्यांना अधिक कमाई होते. आता याच कामांची व्याप्ती वाढवून अंध प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार आहे.
मार्च महिन्यातील कोरोना संचारबंदीमुळे औद्योगिक वसाहतीतील इतर सर्व कारखाने बंद झाल्यानंतरही अंबरनाथच्या औद्योगिक विभागातील नॅब संचालीत अंध बांधवांचे पॉलिेटेक्निक अल्प प्रमाणात का होईना सुरू राहिले. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाल्यानंतर या नॅब प्रशिक्षण केंद्रातील बहुतेक अंध बांधव आपापल्या घरी गेले. मात्र तिघांना घरी जाणे जमले नाही. त्यामुळे ते कार्यशाळेतच कर्मचाऱ्यांसह काम करीत आहेत. या संचारबंदीच्या काळात त्यांना मिळणाऱ्या विद्यावेतनाव्यतिरिक्त या प्रत्येक अंध बांधवाने दोन ते अडीच हजार रूपयांची कमाईही केली आहे. इतर प्रशिक्षणार्थीही केंद्रात परत येण्यास उत्सुक असले तरी ‘कोरोना’ सह जगताना कोणत्याही वस्तूला स्पर्श करून जाणून घेण्याच्या सवयीला अंध बांधवांना आता मुरड घालावी लागणार आहे. शिकता शिकता कमविण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या केंद्रात लवकरच स्थानिक उद्योजकांची संघटना असलेल्या ‘आमा’च्या सहकार्याने प्लास्टिक प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे अंध बांधवांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये लहान-मोठे एक हजाराहून अधिक कारखाने आहेत. तिथून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचऱ्यात टाकले जाते. या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणारा प्रकल्प नॅब पॉलिटेक्निकच्या सहकार्याने ‘आमा’ संघटना राबविणार आहे. प्लॅस्टिकच्या पुनर्वापरामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनास हातभार लागेल, अंध बांधवांना रोजगार मिळेल त्याच बरोबर शहरातील उद्योजकांना प्लस्टिकचा कच्चा माल लागतो तो याच प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याचा विश्वास आमा या संघटनेचे अध्यक्ष आणि नॅब पॉलिटेक्निकचे स्थानिक कमिटीचे चेअरमन उमेश तायडे यांनी व्यक्त केला. ‘नॅब’ कार्यशाळेच्या आवारात महाराष्ट्रातील नॅब च्या माध्यमातून अंध प्रशिक्षणार्थीं बनवीत असलेल्या विविध वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन आणि विक्री केंद्रही उभारण्यात येणार असल्याचे उमेश तायडे यांनी सांगितले.
नॅब पॉलिटेक्निकमधील बहुतेक प्रशिक्षणार्थी लॉकडाउनमुळे घरी गेले आहेत. कार्यशाळेतील कर्मचारी आणि तीन अंध प्रशिक्षणार्थी कार्यशाळेत काम करीत आहेत. रुग्णालयातील खाटांना लागणाऱ्या काही सुट्या भागांची जुळणी करण्याचे काम या कार्यशाळेत सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. घरी गेलेले प्रशिक्षणार्थी संस्थेत परत येण्यास उत्सुक आहेत. त्यांचे फोन येत आहेत. मात्र सध्या सर्वच शैक्षणिक संस्था बंद आहेत. शासनाची परवानगी मिळाली की लगेच येथील प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू होईल असा विश्वास नॅब आयडीबीआय पॉलिटेक्निक, अंबरनाथचे सहसंचालक उमेश देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. कोरोना संचारबंदीच्या काळात नॅब या संस्थेच्या माध्यमातून अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, नेरळ आदी परिसरातील शेकडो अंध कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे संच दिले असल्याचेही उमेश देशपांडे यांनी सांगितले.
481 total views, 1 views today