पत्रकारांनाही लोकल रेल्वे प्रवासाची सुविधा मिळणार

मुख्य सचिव अजोय मेहता यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघास आश्वासन

मुंबई : आरोग्य सेवा तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल रेल्वेतून प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेत असलेल्या पत्रकारांना अजून ही सुविधा देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट घेतली. त्यावेळी येत्या आठवडाभरात पत्रकारांनाही लोकल रेल्वेतून प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, उपाध्यक्ष दीपक भातुसे आणि माजी अध्यक्ष चंदन शिरवाळे यांनी भेट घेऊन पत्रकारांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी याविषयी चर्चा केली.
आरोग्य कर्मचारी व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यात पत्रकारांना प्रवासाची परवानगी दिलेली नाही.
केंद्र व राज्य सरकारने कोरोना संकटात पत्रकारांनाही अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले आहे. या काळात धोका पत्कारून पत्रकार हे जनतेला माहिती देण्याचे आणि कोरोना विषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. सध्या पत्रकारांना अनेकदा वार्तांकन मुंबई, मुंबई उपनगर आणि अन्य शहरात जावे लागत आहे. त्यामुळे
पत्रकारांनाही लोकल रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वार्ताहर संघाच्यावतीने मुख्य सचिवांकडे करण्यात आली.
मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सद्या आरोग्य यंत्रणेसंबंधीत लोकांना लोकल रेल्वे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अन्य खासगी रुग्णालये देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही मागणी करीत आहेत. त्यावर विचार करीत आहोत. त्यात पत्रकारांनाही लोकल रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी देण्याचा विचार आहे. येत्या आठवडाभरात त्यावर निर्णय घेऊ असे सांगितले.

 433 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.