महालक्ष्मी एक्सप्रेसची पुनरावृत्ती नकोच – किसन कथोरे

रेल्वे प्रशासनाला आमदारांची सूचना : तालुक्यातील प्रशासन सज्ज
बदलापूर : गेल्यावर्षी रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस महापुरात अडकली आणि कारण नसताना बदलापूरची बदनामी झाली होती. त्याची पुनरावृत्ती होता कामा नये अशी स्पष्ट सूचना आमदार किसन कथोरे यांनी रेल्वे प्रशासनाला दिली. कोरोनाशी लढतानाच पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी तालुक्यात प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
बदलापूर पालिकेच्या सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आमदार किसन कथोरे यांनी वरील इशारा दिला. उपविभागीय अधिकारी तथा पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी प्रास्तविक केले तर मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी आभार प्रदर्शन केले. तहसीलदार जयराज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त विनायक नराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी सुरेंद्र दशोरे आदीसह विविध खात्यांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
गेल्या वर्षी २६ जुलै रोजी महापूर आला. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर स्थानकात न थांबता पुढे गेली आणि महापुरात अडकली. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही. महालक्ष्मी कोपली आणि बदलापूरची बदनामी झाली असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि यापुढे त्याची पुनरावृत्ती न होण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची स्पष्ट सूचनाही कथोरे यांनी केली. याविषयी बोलताना उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे म्हणाले, ज्या ठिकाणी हि गाडी अडकली होती तेथील साकव थोडा जरी खचला असता तर महालक्ष्मी एक्सप्रेस कलंडली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती. मात्र सुदैवाने तसे काहीही घडले नाही.
सध्या सर्वत्र प्रशासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात कोरोनासाठी तैनात झालेली आहे. अशा परिस्थितीतही पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये यासाठी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्ण सज्ज झाली आहे. गेल्या वर्षी २६ जुलै आणि ४ व ५ ऑगस्ट रोजी महापूर आल्यावर जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले होते. हि परिस्थिती लक्षात घेऊन यंदा पूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने आत्ताच बारवी धरणात पाण्याचा साठा मुबलक असल्याने यंदा बारवी धरण लवकर भरणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे प्रशासनाने बारवी धरणाच्या अधिकर्त्यांशी सतत संपर्कात रहावे आणि बारवी धारण भरून वाहण्याच्या वेळी शहरात सतर्कता बाळगण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज ठेवण्याची महत्वपूर्ण सूचनाही आमदार किसन कथोरे यांनी यावेळी केली.
यंदा जुलै महिन्याच्या सुरुवाती पासून ऑगस्ट महिन्याच्या मध्य पर्यंत सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात येईल. नागरिकांनाही वेळोवेळी सूचना देण्यात येऊन सतर्कता बाळगण्यात येईल जेणे करून गेल्यावर्षी नागरिकांची जी मालमत्तेची प्रचंड हानी झाली ती यावेळी कमीत कमी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी यावेळी सांगितले. सहायक पोलीस आयुक्त विनायक नराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र, दिपक देशमुख आदींनीही महत्वपूर्ण सूचना केल्या.

 561 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.