आमदार आणि ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांचा महापौर नरेश म्हस्केवर पलटवार
ठाणे :कोरोना'च्या संसर्गाच्या भीतीमुळे घरातच बसलेल्या महापौर नरेश म्हस्के यांना भाजपाचे आमदार आशिष शेलार ठाण्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन गेल्याचा पत्ताही लागला नाही, अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली. केवळ घाईघाईत प्रेसनोट काढून थयथयाट करण्यापेक्षा स्वत: माहिती घेतली असती, तर बरे झाले असते, असा टोलाही डावखरे यांनी लगावला. पालकमंत्री काय करतात, ते आम्हाला माहित आहे. पण तुम्ही काय काम केले, ते एकदा सांगावे, असेही ते म्हणाले. ठाण्यात करोनाबाधितांसाठी २ हजार ९९५ बेड्स उपलब्ध असल्याचा दावा करणाऱ्या महापौर म्हस्के यांनी स्वत: पालिकेच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी. तेथे त्यांना केवळ १२१२ बेड्स उपलब्ध असल्याचे दिसेल. क्वारंटाईन सेंटर व हॉटेलांचे बेडही मोजत नरेश म्हस्के यांनी स्वत:चे समाधान व आत्मप्रौढी करू नये. ठाण्यात ८३ अॅम्ब्युलन्स असल्याचा दावा करणाऱ्या महापौरांना काही दिवसांपूर्वीच अॅम्ब्युलन्सअभावी रुग्णांची फरफट झाल्याचा विसर पडला का, असा सवालही डावखरे यांनी केला आहे. ठाण्यातील रुग्णांना मोफत उपचार देण्याची त्यांची घोषणा हवेतच विरून गेली, याकडेही डावखरे यांनी लक्ष वेधले. भाजपाचे आमदार घरात बसल्याचा दावा करणाऱ्या महापौर नरेश म्हस्के यांनी भाजपा आमदार व कार्यकर्त्यांच्या लॉकडाऊनमधील कार्याची आधी माहिती घ्यावी. उगागच प्रेसनोट काढून प्रसारमाध्यमांत झळकण्याचा आटापिटा करू नये, असा टोलाही निरंजन डावखरे यांनी लगावला आहे. कोरोना रुग्णांच्या चाचणीसाठी भाजपाने सुरू केलेल्याकमळ कवच’ला रुग्णांची सोय होत होती. मात्र, लोकांचे आरोग्य न पाहता महापौरांनी तक्रार केली. अन, `कमळ कवच’ बंद पाडण्यात आले. त्यातून महापौरांची कोरोना रुग्णाप्रती आस्था लक्षात आली, असेही आमदार डावखरे यांनी म्हटले आहे.
580 total views, 1 views today