१००० बेड हॉस्पीटलच्या देणग्या एमसीएचआय, जितो ट्रस्टच्या तिजोरीत

ठाणे महापालिका आयुक्तांचा अजब निर्णय, नारायण पवार यांची टीका

ठाणे : कोरोना'च्या काळातील ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या धक्कादायक निर्णयांची मालिका सुरूच आहे. महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्याग्लोबल इम्पॅक्ट हब’ येथील १००० बेडच्या रुग्णालयासाठी कॉर्पोरेट पर्यावरणीय जबाबदारी (सीईआर) निधीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व देणग्या थेट एमसीएचआय व जितो ट्रस्टच्या तिजोरीत जमा होणार आहेत. या संदर्भात महापालिकेकडून थेट बिल्डरांना पत्र पाठवून निधी देण्यास सांगण्यात येत आहे. दरम्यान, या निर्णयावर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी टीका केली असून, सीईआर निधी पुन्हा बिल्डरांच्या खिशात देण्याचा हा प्रकार आहे. रुग्णालय चालविण्यासाठी ठाणे महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन अकार्यक्षम आहे का, असा सवालही केला आहे.

ठाणे महापालिकेचा १००० बेडचे रुग्णालय हा `ड्रीम प्रोजेक्ट’ मानला जातो. माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये रुग्णालय उभारले जात असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयाची जबाबदारी महापालिकेची असल्याचे मानले जात होते. प्रत्यक्षात सीईआर निधीतून रुग्णालय उभारले जात आहे. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी २२ मे रोजी आदेश काढून १००० बेडच्या रुग्णालयाची जबाबदारी एमसीएचआय व जितो एज्युकेशन अॅण्ड मेडिकल ट्रस्टकडे सोपविली आहे.
बड्या बिल्डरांच्या प्रकल्पातून सामाजिक कामांसाठी कॉर्पोरेट पर्यावरणीय जबाबदारी (सीईआर) निधी जमा केला जातो. त्यातून सरकार वा महापालिकेला आरोग्यासह विविध कामे करता येतात. त्यानुसार ठाणे महापालिकेने शहरातील बड्या बिल्डरांकडून निधी जमविण्यास सुरूवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी शहरातील बड्या बिल्डरांना पत्रे पाठविली आहेत. त्यात एमसीएचआय, ठाणे आणि जितो ट्रस्टच्या खात्यावर थेट निधी जमा करण्याची सुचना देऊन खात्यांचा सविस्तर तपशील दिला आहे.
या प्रकाराला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे. सामाजिक कामांसाठी सीईआर निधी अस्तित्वात आला. त्यातून सरकारी यंत्रणेने स्वत: कामे करण्याची अपेक्षा आहे. ठाण्यातील बिल्डर लॉबीने शहराचे किती भले केले, हे सर्व सुजाण ठाणेकर जाणत आहेत. अशा परिस्थितीत बिल्डरांकडून निधी जमा करून, तो बिल्डरांच्या संघटनेलाच वापरण्यास देणे किती संयुक्तीक आहे, असा सवाल पवार यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे. रुग्णालय चालविण्यासाठी ठाणे महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन अकार्यक्षम आहे का. महापालिका संबंधित प्रकल्पावर नियंत्रण ठेवणार असल्याचे स्पष्ट केले जात असले, तरी ते प्रत्यक्षात होईल का, असा सवालही त्यांनी केला आहे.

भरमसाठ दराच्या खरेदीसाठी पळवाट : नारायण पवार
कोरोना'च्या आपत्तीत भरमसाठ दराने साहित्याची खरेदीचा प्रकार महापालिकेत उघडकीस आला होता. त्याच पद्धतीने १००० बेडच्या रुग्णालयासाठी जादा दराने साहित्य घेऊन भ्रष्टाचार करण्याची संधी साधण्यासाठी, रुग्णालयाचे व्यवस्थापन व कारभार एमसीएचआय व जितो ट्रस्टकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून खरेदी केलेल्या वस्तूंचे दर कोण निश्चित करणार. जितो शब्दाचा अर्थ हाआंतराष्ट्रीय जैन व्यापारीक संघटना’ असा आहे. एका व्यापारी संघटनेच्या माध्यमातून महापालिका सामाजिक हित कसे साधते, ते अनाकलनीय आहे, असा टोलाही नगरसेवक नारायण पवार यांनी लगावला आहे.

 501 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.