तर महावितरणमधील कंत्राटी कामगार बेमुदत काम बंद करणार


कोरोना काळात जनतेला अहोरात्र वीज सेवा सुरळीत देताना मरण पावलेल्या महाराष्ट्रातील ८ कामगारांच्या तोंडाला पाने पुसल्याचा सरकारवर आरोप

कल्याण  : महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीजकंपन्यांतील हजारो कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत शासन आणि प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात कंत्राटी कामगार संघटनेने हा इशारा दिला आहे.
सध्याच्या कोरोनाच्या काळातही आणि निसर्ग चक्रीवादळात अखंडीत वीज पुरवठा देण्याकरिता कंत्राटी कामगारांनी जीव धोक्यात घालून काम केले. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात वीज वाहिन्यांवर काम करताना एकूण ८  कंत्राटी कामगार मृत पावले  तर १२ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. असे असतानाही वेळेवर न मिळणारे वेतन, सॅनिटायझरसाठी मंजूर निधीही न देणे,  मेडिकल स्कीम अथवा विमा सेवा नाही, काम करताना मृत झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत नाही, अपघात झाल्यास कंपनीकडून मदतीची तरतूद नसल्याचे या संघटनेचे कल्याण परिमंडळ अध्यक्ष मनोज मनुचारी यांच्यातर्फे सांगण्यात आले.
रेल्वे अपघातात मृत झालेल्या १६ परप्रांतीय कामगारांना शासनाने प्रत्येकी ५ लाख रुपये तातडीने दिले. मात्र कोरोना काळात जनतेला अहोरात्र वीज सेवा सुरळीत देताना मरण पावलेल्या महाराष्ट्रातील ८ कामगारांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत या सर्व समस्या सोडवण्याच्या दृष्टीने ही आंदोलनाची हाक देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीच्या निषेधार्थ शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ४ टप्यात आंदोलन केले जाणार असून पहिल्या टप्यात १५ जून रोजी काळ्या फिती लावून काम, दुसऱ्या टप्यात २५ जून रोजी PF ऑफिस, ESI ऑफिस, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, तहसीलदार ऑफिस , जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन,  तिसऱ्या टप्यात १ जुलै रोजी राज्यातील सर्व कंत्राटी कामगार हे काळ्या फिती , काळे झेंडे, निषेधाचे बोर्ड घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता कार्यालया निदर्शने करतील आणि चौथ्या आणि अंतिम टप्प्यात
७ जुलैच्या रात्री १२ वाजल्यापासून तिन्ही कंपनीतील सर्व कंत्राटी कामगार मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करतील अशी माहितीही मनुचारी यांनी दिली आहे.

 342 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.