१२०० बेडचे करोना रुग्णालय सेवेत दाखल

एकनाथ शिंदे आणि राजेश टोपे यांनी पाहणीनंतर दिले निर्देश; आयसीयू सुविधाही लवकरच
 
नवी मुंबई : नवी मुंबईतील करोनाच्या रुग्णांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून हे तात्काळ रुग्णसेवेत दाखल करण्याचे आदेश शिंदे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले. टोपे यांच्या समवेत शिंदे यांनी आज या रुग्णालयाची पाहाणी केली. या ठिकाणी ५० बेड्सचे आयसीयू युनिट उभारून व्हेंटिलेटरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. उद्या, शुक्रवारपासून हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल होत आहे.
नवी मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेच्या सक्षमीकरणासाठी आणि पुरेशा प्रमाणात बेड्स व अन्य सुविधा उपलब्ध असावी, यासाठी शिंदे यांनी सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून १२०० खाटांचे हे रुग्णालय उभारण्यात आले असून येथे ऑक्सिजन आणि नॉन-ऑक्सिजन बेड्ससह एक्स रे, डायलिसिस, पॅथॉलॉजी लॅब आदी सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत. रुग्णालयाची उभारणी सुरू असण्याच्या काळात शिंदे नियमितपणे या ठिकाणी भेट देऊन कामाचा आढावा घेत होते, तसेच रुग्णालय उभारणीपुढील अडचणी तात्काळ सोडवत होते.
या ठिकाणी आणखी जागा उपलब्ध असून गंभीर रुग्णांवर उपचार व्हावेत, यासाठी ५० बेड्सचे आयसीयू युनिट उभारण्याचे निर्देश शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिले. यासाठी आरोग्य खात्याने मदत करावी, अशी विनंतीही शिंदे यांनी राजेश टोपे यांना केली. याप्रसंगी खासदार राजन विचारे, स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, विजय नाहटा, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व अन्य अधिकारी उपस्थित होते.
      या रुग्णालयात ६० डॉक्टर्स, २५० नर्स, ३५० बहुउद्देशीय कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात करणार येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नवी मुंबईतील करोना रुग्णांचा बरा होण्याचा दर ६० टक्के असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत, अशा प्रकारच्या रुग्णालयामुळे आरोग्यसेवेला अधिक बळ मिळून रुग्णांवर अधिक चांगल्या प्रकारे उपचार करता येतील, असे ते म्हणाले.

 370 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.