त्या स्वयंसेवकांना ५० लाखांचा विमा नाहीच

नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी वेधले लक्ष

ठाणे : कोरोना' रोखण्यासाठी महापालिकेने प्रभाग समितीच्या क्षेत्रात घेतलेले स्वयंसेवक कोरोना योद्धे ५० लाख रुपयांच्या विम्याविना कार्यरत आहेत. जीवाचा धोका पत्करून कार्य करणाऱ्या या स्वयंसेवकांना ५० लाख रुपयांचा विमा देण्याबरोबरचकोरोना’चा संसर्ग झाल्यास महापालिकेने उपचार मोफत करावेत, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे.
ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत असून, शहराच्या विविध भागात रुग्ण आढळत आहेत. महापालिकेनेही विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीत झालेल्या नगरसेवक व प्रशासनाच्या बैठकीत नगरसेवकांना स्वयंसेवक देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील बहुसंख्य नगरसेवकांनी तत्काळ काही स्वयंसेवकांची नावे प्रशासनाला कळविली. त्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी कार्य सुरूही केले. विशेष म्हणजे सर्व स्वयंसेवक विनामूल्य महापालिकेला सेवा देत आहेत, याकडे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले.
कोरोना' संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवाला धोका उद्भवल्यास केंद्र सरकारने ५० लाखांच्या विम्याची तरतूद केली आहे. त्यात डॉक्टर, नर्स यांच्यासह सर्व वैद्यकिय कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच सरकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, ठाणे महापालिकेने घेतलेल्या स्वयंसेवकांना ५० लाखांच्या विम्याचे पाठबळ मिळालेले नाही. त्याचबरोबर त्यांनाकोरोना’चा संसर्ग झाल्यास मोफत उपचाराची तरतूद केलेली नाही. त्यामुळे एकप्रकारे त्यांच्यावर अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वयंसेवकांना ५० लाखांचा विमा व मोफत उपचाराची हमी द्यावी, अशी मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

सरकारी यंत्रणांकडून स्वत:ची पाठ थोपटण्याचा प्रकार – मनोहर डुंबरे
स्वयंसेवी व सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांकडून नागरिकांना केल्या जाणाऱ्या मदतीवरच ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांचा भर आहे. अन्न पॅकेट, रेशन वाटपपाठोपाठ, आर्सेनिक अल्बम गोळ्या आदींच्या वाटपाबाबत लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांकडून दररोज माहिती संकलित करून राज्य सरकारला पाठविली जाते. त्यातून स्थानिक यंत्रणेकडून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार होत आहे. गेल्या अडीच महिन्यांच्या काळात अॅम्ब्युलन्स, रुग्णालयांबाबतही महापालिकेला ठोस उपाययोजना करता आलेल्या नाहीत. आता स्वयंसेवकांनाही मोफत राबवून घेण्यावर महापालिकेचा भर आहे, असे मत नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले.

 596 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.