पुढील आठवड्यात कोविड रुग्णालय सुरु होणार : डॉ. श्रीकांत शिंदे

खाजगी वैद्यकीय अधिकारी सेवा देणार पाचशे बेड्चे रुग्णालय

अंबरनाथ : अंबरनाथ येथील अंबरनाथ नगरपरिषदेच्या पुढाकाराने ५०० खाटांचे कोविड रुग्णालय येत्या आठवड्यात प्रत्यक्ष सुरु होणार असल्याचे वचन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. या रुग्णालयात प्राणवायूची सुविधा असलेल्या शंभर खाटा असतील असेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या रुग्णालयात शहरातील खाजगी डॉक्टर सेवा देणार असल्याचे मेडिकल असोसिएन तर्फे डॉ. गणेश राठोड यांनी सांगितले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने अंबरनाथ पश्चिमेकडील सर्वोदय नगर, डेंटल कॉलेज येथे कोविड १९ रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी वरील वचन दिले.
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथचे मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण, कोरोना नोडल अधिकारी मेजर डॉ. नितीन राठोड आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सदर रुग्णालय ५०० बेड्स आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असून लवकरच अंबरनाथकर जनतेच्या सेवेकरिता कार्यरत होणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता भविष्यात शहरातील रुग्णांना खाटाची कमतरता भासणार नाही याकडे पूर्ण लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या आठवड्यात सर्व सुविधांनी सज्ज असे हे रुग्णालय प्रत्यक्ष सुरु करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या रुग्णालयात सेवा देणाऱ्या वैधकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिले.
यापूर्वीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या रुग्णालयाच्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी केली होती. मागील आठवड्यात स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही स्वतंत्र जाऊन कामाच्या प्रगतीची पहाणी केली होती. हे रुग्णालय लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत.
याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर, आमदार डॉ.बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक एड. निखिल वाळेकर, माजी सभापती सुभाष साळुंके, अंबरनाथ मेडिकल असोसिएशनचे डॉ. गौतम जटाले, डॉ. यतीन भिसे, डॉ. गणेश राठोड, डॉ. कुरेशी, डॉ. उषा माहेश्वरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कोविड स्पेशल रुग्णालयात शहरातील मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर सेवा देतील. या पूर्वीही पूर्व आणि पश्चिमेला सुरु करण्यात आलेल्या बाह्य रुग्णालयांना डॉक्टरांनी सेवा दिली असल्याचे मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. गणेश राठोड यांनी सांगितले.

 576 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.