क्लब हाऊस क्वारंटाईन म्हणजे महापालिकेचा निव्वळ मुर्खपणा

नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आयुक्तांच्या निर्णयाची उडवली खिल्ली

ठाणे : सोसायटीमधील हॉलमध्ये कोविड केंद्र व क्लब हाऊसमध्ये रहिवाशांना क्वारंटाईन करण्याचा महापालिकेचा निर्णय म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे. शहरातील १३५ नगरसेवकांपैकी एकाही लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता या निर्णयाने महापालिकेने हात झटकण्यास सुरुवात केली आहे, असे मत भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत गृहनिर्माण सोसायट्यांचे हॉल वा क्लब हाऊसची संख्या मोठी नाही. काही अपवाद वगळता तेथे क्वारंटाईन वा कोविड केंद्रासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यातुलनेत तेथील रहिवाशांची घरे मोठी आहेत. क्लब हाऊसमध्ये क्वारंटाईन राहण्यापेक्षा या व्यक्तींना घरातच ठेवायला हवे, असे मत मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले आहे. सोसायटीतील महिला सदस्यावर क्वारंटाईनची वेळ आल्यास, त्यांना क्लब हाऊसमध्ये ठेवायचे का, महिला-पुरुष एकत्र ठेवायचे का, एका क्लब हाऊस वा हॉलमध्ये किती सदस्यांना ठेवायचे, याचा निर्णय कोणी घ्यायचा, असा सवाल डुंबरे यांनी केला.
क्वारंटाईन सेंटरची साफसफाई रुग्णांनी स्वत: किंवा पीपीई कीट परिधान केलेल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्याने करावी, क्लब हाऊसमध्ये बाहेरील नातेवाईकांना आणू नये, डॉक्टर्सला मानधन रुग्ण वा सोसायटीने द्यावे, क्लब हाऊसमध्ये ऑक्सीजन सिलिंडर बंधनकारक आहे आदी अटी हास्यास्पद आहेत. महापालिकेची मोठी यंत्रणा असूनही, स्वत:च्या क्वारंटाईन केंद्राची साफसफाई केली जात नाही. महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीट पुरविलेले नाहीत, अशा परिस्थितीतीत सोसायट्यांवरील सक्ती अन्यायकारक आहे, असे मत मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले आहे.

महापालिकेने सक्षम नसल्याचे जाहीर करावे : मनोहर डुंबरे
कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यात आम्ही असमर्थ ठरलो आहोत, असे महापालिकेने जाहीर करावे. म्हणजे जनताही आपली काळजी घेण्यास समर्थ राहील, असे मत नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी म्हटले आहे. शहरातील नागरिकांची आरोग्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे, असे नागरिकशास्त्रात शिकविले जात होते. आता महापालिकेच्या निर्णयाने नागरिक शास्त्राचा अभ्यास बदलून आरोग्याची जबाबदारी ही संपूर्णत: नागरिकांची आहे, असे शिकवावे लागेल, अशी प्रतिक्रिया मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केली.

`नगरसेवक नावालाच विश्वस्त’
महापालिकेच्या आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर आयुक्त विजय सिंघल यांनी अद्यापि एकदाही कॉन्फरन्सद्वारे नगरसेवकांशी संवाद साधलेला नाही. नगरसेवक केवळ नावालाच विश्वस्त राहिले आहेत, असे मतही डुंबरे यांनी व्यक्त केले.

 450 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.