आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीला यश
ठाणे : `कोविड’चे निदान झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना आता ठाण्यातील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीनंतर महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी डॅशबोर्ड सुरू केला आहे.
ठाणे शहरातील विविध भागात कोविडचे रुग्ण आढळत आहेत. महापालिकेने सिव्हील रुग्णालयाबरोबरच विविध खाजगी रुग्णालये रुग्णांसाठी अधिग्रहित केली आहेत. तर अनेक रुग्णालयांमध्ये कोविडच्या रुग्णांना दाखल केले जात नाही. त्यामुळे विशिष्ट रुग्णालयातील उपलब्ध खाटांबाबत रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती उपलब्ध होत नव्हती. काही वेळा रुग्ण पोचल्यानंतर जागा उपलब्ध नसल्याचे कळत होते. त्यामुळे कोविडच्या रुग्णांना अन्य रुग्णालयात जावे लागत असल्याने संसर्गाचीही भीती होती. या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे रुग्णालयातील खाटांबाबत माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानुसार ठाणे महापालिकेने डॅशबोर्डची सेवा सुरू केली.
ठाणे शहरातील नागरिकांना www.covidbedthane.in या वेबसाईटवर डॅशबोर्ड उपलब्ध होणार आहे. त्यावरुन रुग्णांच्या नातेवाईकांनी माहिती घ्यावी, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.
574 total views, 1 views today